भाजपचे नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप
*⚡मालवण ता.१७-:* तौक्ते वादळात प्रशासनाने केवळ शिवसेनेच्या लोकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिली. ज्यांचे खरोखरच नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई कधी देणार ? नुकसान ग्रस्तांच्या याद्या या शिवसेना शाखेत तयार होऊन तहसीलदारांनी केवळ सह्या मारण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी जे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अन्यथा तहसीलदार पदाच्या खुर्चीत बसायला देणार नाही असा रोखठोक इशाराही त्यांनी मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांना दिला तौक्ते वादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यासाठी देवबाग येथील ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांची मालवण येथील निलरत्न बंगल्यावर भेट घेतली. त्यांनतर निलेश राणे यांनी मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, गणेश कुशे, बाबा मोंडकर, आनंद शिरवलकर,विक्रांत नाईक, हरीश गावकर, भाई मांजरेकर, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देवबाग मध्ये शिवसेनेशी संबंधित काही ठराविक लोकांना मदत मिळाली असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावर निलेश राणे यांनी या नुकसानग्रस्त लोकांना कधी पैसे मिळणार सांगा आम्ही इथून निघून जातो. मी हवेत गोळीबार करणाऱ्यातला नाही. त्यामुळे जो शिल्लक निधी आहे त्यातून इतर नुकसानग्रस्तांना मदत द्या. तौक्ते वादळातील नुकसान ग्रस्तांपैकी केवळ अमुक एका झेंड्याच्या लोकांना न्याय मिळणार असेल तर हा कसला कारभार सुरू आहे ? सत्ताधाऱ्यां मुळेच हे प्रकार होत आहेत. शिवसेना सत्ताधारी आहे म्हणून असं चालू असेल तर जाहीर करा असे सांगत डॉ निलेश राणे म्हणाले, जिथे नुकसानच झालं नाही तेथे एक लाख, दोन लाख ? काय चाललंय काय? जर सर्व्हे नंबर दिला तर काय कारवाई करणार ? ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामा सुदधा झाला नाही. ज्याचे नुकसान नाही त्यांना एक- एक दोन दोन लाख रुपये मिळाले. या प्रकारांची चौकशी झालीच पाहिजे. शिवसेनेनं मालवण काबीज केला आहे का ? मालवण त्यांच्या बापाचं माल आहे ? तुम्ही फरपटत जाल यामध्ये आम्ही काय नियमाच्या बाहेर मागतोय काय ? अनधिकृत करायला लावतोय काय ? शिवसेना शाखेत बनविलेल्या यादीवर तुम्ही सही मारता ? मला तुमच्याशी संघर्ष करायला लावू नका आणि तशी वेळही येऊ देऊ नका. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या मदतीची चौकशी करा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत तातडीने कार्यवाही करून वंचितांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे डॉ .निलेश राणे म्हणाले.
