पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणावा

रोणापाल सरपंच सुरेश गावडे : जिल्हा दौरा समस्या सोडविण्यासाठी करा

बांदा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हा दौरा करत असल्याने स्वातंत्र्यदिनी छेडण्यात येणारी उपोषणे, धरणे आंदोलनाला नेमक्या कोणत्या उत्तराने समाधानी करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बहुतांश उपोषणे ही केवळ निधीच्या मागणीसाठी असल्याचे दिसून येत असल्यामुळे स्वातंत्र्यदिन की उपोषण दिन हे समजणे कठीण झाले असल्याचे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 120 पेक्षा अधिक उपोषणे विविध न्याय मागण्यांसाठी होणार आहेत. जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने शेकडो नागरिकांना स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसावे लागते. मंत्रालयातून सिंधुदुर्ग जिह्यात येताना जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत किती निधी आणतात आणि किती उपोषणांनी ठोस कार्यवाहीचे आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर पालकमंत्री निधी आणण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे श्री.गावडे म्हणाले. जनतेच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मुजोर अधिकारी दिलेल्या अर्जाची योग्यवेळी दखल घेत नसल्यामुळे अशा शेकडो नागरिकांना स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी उपोषणे व धरणे आंदोलन करावे लागते. पालकमंत्री सामंत यांनी मोठा निधी जिल्ह्यासाठी आणल्यास बहुतांश सर्वच उपोषणे मागे घेतली जातील. त्यामुळे आजचा स्वातंत्र्यदिन पालकमंत्री उपोषण दिन म्हणून साजरा करणार की स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणार असा संभ्रम निर्माण होत असल्याचे सुरेश गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले.

You cannot copy content of this page