*⚡कणकवली ता.१४-:* कोकणामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत चार चक्रीवादळे आलीत. अलीकडे कोकणातील अनेक भागात महापूर आलेत. अब्जावधी रुपयांच्या संपतीचे नुकसान झाले. भूसख्खलनामुळे दिडशेच्या वर बळी गेलेत. मात्र या भयानक आपत्तीच्या परिस्थितीत कोकणवासियांना सावरण्यासाठी कोकणातील सर्वं पक्षीय लोकप्रतिनिधी संघटितरित्या एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे होते. पण दुर्दैवाने असे घडत नाही, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. कोविआचे भागाभागांतील कार्यकर्ते आपल्यापरीने या अस्नामी संकटात लोकांना मदतकार्य करीत आहेत. मात्र त्यांना विदारक चित्र दिसत आहेत, अशी माहिती देऊन ते म्हणाले, अशा अस्नामी संकटाच्या वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील लोकप्रतिनिधी पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून पुरग्रस्तांना जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी एकदिलाने काम करीत आहेत. विकास कामांच्या बाबतीतही ही मंडळी अहममिहकेतून कार्य करतात. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींमध्ये पक्षीय वैरभाव असल्याने अशा परिस्थितीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे फावते आहे. जनतेचे मात्र हाल होत आहेत. कोकणातील मतदार या सुजाण असल्याने निवडणूकांच्या वेळी उमेदवारांचा पक्ष बघत नाही. त्यांची कार्यप्रणाली, कार्यकुशलता, विकासाभिमुख द्दष्टी आदींचा विचार करून मतदान करतो, असे मत मांडून ते म्हणाले, मात्र त्यानंतर निवडून आलेले खासदार, आमदार आदी प्रतिनिधी पक्षीय राजकारणामुळे या मतदारांची प्रतारणा करतात. कोकणात गेल्या काही वर्षांत वारंवार उदभवणार्यां नैसर्गिक आपत्तीमुळे बहुसंख्य कोकणवासिय आर्थिक आणि मानसिक द्दष्टीने पिचला गेला आहे. लोकप्रतिनिधींनी कोकणच्या विकास कामांच्या बाबतीत खेकडाव्रुतीने काम न करता एकोप्याने काम करावे अशी रास्त अपेक्षा असते. मात्र दुर्दैवाने आपत्तीच्या परिस्थितीत ही मंडळी एकत्र येत नाहीत. त्यामुळे कोकणवासियांची फरफट होत आहे. त्यांना अपेक्षेच्या मानाने तुटपुंजी आर्थिक मदत मिळत असल्याने तो दारिद्र्याच्या खोल गर्तेत फेकला जात आहे, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तो अशा लोकप्रतिनिधींना धडा शिकविल्याशिवाय गप्प रहाणार नाही.
आपत्तीप्रंसगी तरी कोकणातील लोकप्रतिनिधींनी संघटितरित्या एकत्र यावे:मोहन केळुसकर
