जन आशीर्वाद यात्रा ११ जिल्हे, ९ लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करणार:प्रमोद जठार
*⚡कणकवली ता.१४-:* केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांच्या स्वागताची जन आशीर्वाद यात्रा सर्वाधिक लांबीची आहे. या यात्रेत ११ जिल्हे, ९ लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करून या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे होणार आहे. तब्बल ३०० पेक्षा जास्त ठिकाणी नारायण राणे यांचे स्वागत होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस आणि राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे मुख्य संयोजक प्रमोद जठार यांनी आज येथे दिली.सिंधुदुर्गात राणेंचे न भूतो न भविष्यती असे स्वागत होईल असेही ते म्हणाले. जन आशीर्वाद यात्रेच्या अनुषंगाने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आढावा बैठक कणकवली येथील प्रहार भवनमध्ये झाली. त्यानंतर याबाबतची माहिती भाजप प्रदेश चिटणीस आणि राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे मुख्य संयोजक प्रमोद जठार यांनी दिली. त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, ॲड.अजित गोगटे आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, केंद्राच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना स्थान मिळाल्याने आता कोकणच्या विकासाचा बॅकलाॅक भरून निघणार आहे. रिफायनरीसह अनेक उद्योगांची उभारणी पुढील काळात होऊन कोकणात हजारो-लाखो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राणेंच्या माध्यमातून आता कोकणचा संपूर्ण कायापालट होणार आहे. केंद्रीयमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच कोकण आणि सिंधुदुर्गात येणार असल्याने त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात भव्य स्वागत होणार आहे. या यात्रेत राणेंची कुठेही जाहीर सभा होणार नाही. तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ते येत आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सात वर्षात केलेली दिमाखदार कामगिरी जनतेपर्यंत पोचविण्याचाही प्रयत्न आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत विविध क्षेत्रातील कारागिरांचा सत्कार होणार आहे. चिपळूण, खारेपाटण येथील पूरग्रस्तांशी राणे संवाद साधणार आहेत. तसेच विविध संस्था, प्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक यांची निवेदने देखील राणे या यात्रेत स्वीकारणार आहेत. मराठा, मुस्लीम, ओबीसी, बुद्धीष्ट आदी सर्व समाज आणि संघटनांच्यावतीन राणेंचे स्वागत होणार असल्याचे जठार म्हणाले. २५ ऑगस्टला जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे येतील. तेथून तळेरे, नाधवडे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे ते कणकवलीत दाखल होणार आहेत. २६ रोजी ते सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांचा दौरा करतील. तर २७ रोजी देखील त्यांचा मुक्काम सिंधुदुर्गात राहावा यासाठी भाजपची मंडळी प्रयत्नशील असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. ना.नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूतो न भविष्यती असे स्वागत होईल ऑइल कणकवली नगरी यानिमित्ताने दिव्यांनी उजळणार असून नगर पंचायतीच्या माध्यमातून त्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगताना प्रमोद केंद्रात प्रथम क्रमांकाची शपथ घेणाऱ्या नारायण राणे यांच्या रूपाने सिंधुदुर्गला सुगीचे दिवस आले आहेत. केंद्रातील मोदी सरकार मध्ये जम्बो मंत्रीमंडळ असून 78 अधिक 43 अशाप्रकारे मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षात केलेले विकास कामे या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगताना राममंदिर ,कलम 370 यासारखे विविध विषय जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचे ते म्हणाले.
