मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा

चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून साजरी होते नागपंचमी

*⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-:* दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे.मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फडांचा असतो. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्राविषयी प्रेम निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास विसर्जन केले जाते. मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा कै. शांताराम बंडू गोसावी व कै. रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर ही परंपरा त्यांची मुल धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंबीय जतन करीत आहेत. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन व एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते. नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात येते. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानात नागाचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दुध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. नागपंचमीनिमित्त दरवर्षी भजन, फुगड्या आदी विविध धार्मिक कार्यक्रमही साजरे होतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने ही नागपंचमी साजरी करण्यात येणार असल्याचे गोसावी घराण्याच्यावतीने सांगण्यात आले. दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा ‘व्हवसा’ कार्यक्रम होणार आहे. मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच उपस्थिती दर्शवून नागोबाचे दर्शन घेत आहेत. उद्या शनिवारी नागोबाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे.

You cannot copy content of this page