रस्त्याची ग्रामीण रस्ते विकास विभागाने दुरुस्ती करावी;सरपंच सौ. साक्षी कांबळी
*⚡मालवण दि.१२-:* चौके बावखोलहून आंबेरी मार्गे धामापूरला जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तील साडे सहा कि.मी.च्या रस्त्याची अवघ्या तीन वर्षात दुर्दशा होऊन पुर्णतः चाळण झाली आहे. यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून काही ठिकाणी रस्त्याला खचला असून वाहतुकीस हा मार्ग पुर्णतः धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची ग्रामीण रस्ते विकास विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंबेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. साक्षी कांबळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. चौके बावखोल ते आंबेरी मार्गे धामापूर हा रस्ता ग्रामविकास मंत्रालयाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर केला. या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्ची घालण्यात आले. या रस्त्यामुळे आंबेरीतील ग्रामस्थांना कुडाळला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र रस्ता केल्यापासून अवघ्या तीन वर्षात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. तसेच कंत्राटदाराने काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे, मात्र संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. ग्रामीण रस्ते विकास विभागाने रस्त्याच्या डागडुजीबाबत कार्यवाही करावी, याबाबत आंबेरी ग्रामपंचायती तर्फे सरपंच सौ. साक्षी कांबळी यांनी लक्ष वेधले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा मार्ग ठिकठिकाणी दोन फूट खचला आहे. बऱ्याच ठिकाणी मार्गानजीक घळण कोसळलेल्या असल्याने रस्त्यावर दगड, माती वाहून आलेली आहे. त्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे बनले असून रस्त्यानजीकच्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गाची चाळण झाल्याने अनेक अपघात घडले आहे. तसेच दुचाकी, रिक्षा, अन्य वाहनांच्या वाहतुकीला धोकादायक मार्ग बनला आहे, त्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष ओहनी करून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सरपंच कांबळी यांनी केली आहे.
