मालवण गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांचे प्रतिपादन
*⚡मालवण दि.१२-:* केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात महिला म्हणाव्या तशा सक्षम झालेल्या नाहीत. त्यामुळे महिलांनी स्वतः पुढे येत महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व निधीची माहिती घेऊन स्वतःची उन्नती स्वतः केली पाहिजे. मानसिकता, सवयी आणि स्वभाव यात बदल करून स्वतःमधील कौशल्य विकसित करून महिलांनी व्यवसायाची कास धरावी असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी केले. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व्हीएम मार्ट, लायन्स क्लब मालवण, युवा परिवर्तन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील दैवज्ञ भवन मध्ये आयोजित केक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव सौ. जयश्री हडकर, खजिनदार सौ. अनुष्का चव्हाण, प्रशिक्षक सतीश पाटणकर, पर्यटन महासंघाचे उपाध्यक्ष डी. के. सावंत उपाध्यक्ष, खजिनदार नकुल पार्सेकर पर्यटन महासंघ मालवण अध्यक्ष अविनाश सामंत, सौ. वैष्णवी मोंडकर, सौ. राधिका मोंडकर, जितू पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेते संघाचे अध्यक्ष शेखर गाड, सौ. दीक्षा गावकर, सौ. अंजली आचरेकर, सौ. वैशाली शंकरदास, दीपक कुडाळकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी बाबा मोंडकर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी उमेद योजनेच्या माध्यमातून बचत गटांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत महिलांनी व्यावसायिक लक्ष्य निर्धारित करून त्यादृष्टीने वाटचाल करावी. यासाठी शासकीय सहकार्य केले जाईल, असे सांगितले. तर बाबा मोंडकर यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून आम्हाला उद्योजक निर्माण करायचे आहेत, आजच्या केक प्रशिक्षणातून केक व्यवसायातील उद्योजक तयार झाले पाहिजेत, महिला व युवकांनी आपल्यातील कलागुण व व्यावसायिक जागृत करणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी सतीश पाटणकर, विश्वास गावकर, दीपक कुडाळकर यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन नकुल पार्सेकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना प्रशिक्षकांकडून विविध प्रकारचे केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
