वजराठ देवसुवाडीतील नागरिक करणार १५ ऑगस्टला उपोषण

रस्ता बंद केल्याने दिला इशारा

*⚡वेंगुर्ले ता.१२-:* तालुक्यातील वजराठ देवसुवाडी येथील काही रहिवाश्यांचा जमिनीच्या वादातून येथील सोनू विटेकर व कुटुंबियांनी पिढ्यान पिढ्या वापरात असणारा रस्ता बंद केल्याने. याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य महिती घेऊन पाहणी करून रस्ता खुला करावा अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याबाबत येथील ग्रामस्थ लक्ष्मण नळेकर, गोपाळ नळेकर, विजय नेळेकर, रश्मी नळेकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, येथील सर्व्हे नं. ५१-६३/२ मध्ये आम्ही राहत असून याच सर्व्हे नं. मध्ये पाच जणांच्या आंबा बागा व त्याखाली शेतजमिन अशी एकूण तीस एकर जमिन आहे. आणि त्या जमिनमध्ये जाण्या-येण्यासाठी व घर मालकांना जाण्यासाठी पिढ्यान पिढ्या वापरात येणारा रस्ता आहे. या जमिनीचे मालक सोनु राजाराम विटेकर, विलास रा. विटेकर, जानकी रा. विटेकर, चंद्रहास रा. विटेकर व उषा रा. विटेकर यांची जमिन सर्व्हे नं. ५३/७२ सामाईक असून ती पोटखराब्यास सुमारे ६१ गुंठे आहे. त्यामध्ये जाण्या येण्यासाठी हा रस्ता आहे. या रस्त्यासाठी चार भागीदारांची लेखी स्वरुपाची तहसिलदार कोर्टात सहमती दिली असून फक्त सोनू विटेकर या एकमेव सहहिस्सेदार यांनी कुटुंबियांच्या समवेत स्वतःचे बळ वापरुन तीन ते चार पिढया वापरत असणारा रस्ता पुर्णपणे बंद केला. वास्तविक संदर रस्ता विलास विटेकर यांच्या वहिवाट मधून जातो. आमच्या चार घरामध्ये मिळून ३५ व्यक्ती आहेत. त्यातील तीन व्यक्ती वृध्द व आजारी आहेत. त्यातच गोपाळ लक्ष्मण नळेकर मधुमेहाने ग्रस्त असून त्यांच्या दोन्ही पायांची बोटे काढली आहेत. त्यांची जखम अजूनही सुकलेली नाही. त्यांना रोज ड्रेसिंग करावे लागते. परंतू रस्ता बंद असल्यामुळे डॉक्टर घरी येऊ शकत नाही. तसेच कोणतेही वाहने घरी येत नसल्यामुळे डॉक्टरकडे नेऊन त्यांना उपचार देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. अश्या कारणामुळे जर त्यांच्या जिवाला धोका उद्भवल्यास याला सोनू विटेकर व मुलगा सुनिल विटेकर हे जबाबदार असतील. त्यांची नोंद घ्यावी. तसेच आमचे सध्या राशन पाणी बंद आहे. लहान मुलांना शाळेत क्लासला जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. गुरे ढोरे यांचा रस्ता बंद केल्यामुळे चारा पाण्या अभावी उपासमार होत आहे. तसेच भात शेती (नडणी) करणे, आंबा बागायतीला खत देणे यासर्व गोष्टी राहून गेल्यामुळे सदर पिकांचे भारी प्रमाणात नुकसान चालले आहे. ह्या सर्व गोष्टी जाणून बुजून, मुद्दाम त्रास देण्यासाठी सोनू विटेकर करत आहे. तरी वरील विषयावर आपण स्वतः पाहणी करुन रस्ता मोकळा करावा. अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिना दिवशी मा. जिल्हाधिकारी साहेब सिंधुदुर्ग यांचे कार्यालया समोर आम्हा ग्रामस्थांना आमरण ऊपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page