*⚡मालवण ता.१२-:* गावात धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी तळाशीलवासीयांनी १५ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनास गाबित समाज मालवण तालुका कार्यकारिणीने पाठिंबा दर्शविला आहे. गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मालवण येथील गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात गाबित समाज कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे, भाऊ मोरजे आनंद खडपकर, सहदेव साळगावकर, राधीका कुबल, दीक्षा ढोके, अरविंद मॉडकर, दादा बाघ, महेश जुवाटकर आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीवरील गावांना तौक्ते, क्यार आणि निसर्गसारख्या महाचक्रीवादळांचा जोरदार तडाखा बसला. काही गावांमध्ये पावसाळ्यातील सागरी अतिक्रमणाची समस्या भीषण बनली आहे. अशा गावांमधील गाबित समाज बांधव शासनाकडे धूपप्रतिबंधक बंधारा कम रस्त्याची मागणी लावून धरत आहेत. त्यांच्या या मागणीस गाबित समाज कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. दरम्यान, बैठकीत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील प्रस्ताव मंजूर करण्यास म्हणावी तशी गती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यानुसार सभा संपल्यानंतर गाबित समाज कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे प्रस्ताव जास्त दिवस प्रलंबित न ठेवता ते तात्काळ मंजूर करावेत, अशी मागणी गाबित समाजाच्या वतीने करण्यात आली, मत्स्य संपदा योजना प्रस्ताव मंजुरीस गती देण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे गाबित समाजकडून सांगण्यात आले.
तळाशीलवासीयांच्या 15 ऑगस्टच्या उपोषण आंदोलनास मालवण गाबित समाजाचा पाठिंबा
