तुकाराम बांदकर करणार १५ ऑगस्टला उपोषण
*⚡ओरोस ता.११-:* रोजगार हमी योजना हजेरी सहायकांच्या सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ठ करून शासकीय सेवेत घेतले जात नाही. या गेली २३ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी देवगड तारामुंबरी येथील रोहयो हजेरीपट सहाय्यक तुकाराम शंकर बांदकर यांनी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तुकाराम बांधकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत तसेच गेली २३ वर्षे शासन व प्रशासन स्तरावर अनेक वेळा लक्ष वेधुनही त्याची दखल घेतली जात नाही. या बाबत पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की तत्कालीन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड यांनी सन १९९३ मध्ये लेखी आदेशाने रोजगार हमी योजनेच्या किंजवडे ते बाईतवाडी रस्ता तयार करणे या कामावर माझी हजेटीपट साहाय्यकपदी नेमणूक केली. या कालावधीत माझ्याकडून रोजगार हमी योजनेच्या हजेरीपट सहाय्यकाची कामे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड या शासकीय कार्यालयातील कामे माझ्या स्व हस्ताक्षरात करून घेण्यात आलेली आहेत. या बाबतचे सर्व लेखी पुरावे प्रशासनास यापूर्वीच सादर केलेले आहेत. तरीही गेली २३ वर्षे रोजगार हमी योजना हजेरी सहाय्यकाच्या सेवाजेष्ठता यादीत माझे नाव समाविष्ठ करुन शासन सेवेत घेतलेले नाही. यामुळे माझे भविष्य आणि आयुष्य उध्वस्त झाले आहे. याबाबत यापूर्वी २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी आंदोलन छेडून पालकमंत्री व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनी पुकारलेले आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन तात्पुरते स्थगित केले होते . तरीही अद्याप न्याय मिळालेला नाही. याबाबत पुन्हा एकदा शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहे. तरी याबाबत दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा , अशी मागणी या निवेदनातून तुकाराम बांदकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
