संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे

गोपुरी आश्रमात सहविचार बैठकीत धाकू तानवडे यांचे आवाहन

*⚡कणकवली दि.१०-:* समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने सक्षम मानसिकता तयार करण्यासाठी या मंडळींची आवश्यकता आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून हे काम स्वातंत्र्य पूर्व आणि स्वतंत्र्योतर काळात सुरू होते. आजही ते सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यामंदिर प्रशालेचे माजी शिक्षक व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी धाकू तानवडे यांनी केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांनिमित्त 9, ऑगस्टपासून संपूर्ण देशभर ‘आजादी आंदोलन अभियान’ सुरू होत आहे. त्यानिमित्त राष्ट्र सेवा दल-शाखा कणकवलीच्या वतीने गोपुरी आश्रमात आयोजित सहविचार बैठकीत ते बोलत होते. श्री. तानवडे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपले वैयक्तिक जीवन सक्षमपणे जगताना आपण समाजासाठी काय केले याचे चिंतन करायला हवे. मला आज ते चिंतन करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना मानसिक दृष्टीने सक्षम आहे का? याचेही चिंतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. बाळू मेस्त्री म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी मानसिक, वैचारिक दृष्टिकोनातून सक्षम बनविण्याचा प्रयत्न करुया. कणकवली कॉलेजचे राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. बाळू राठोड म्हणाले की, प्रत्येक युवकांत नेशन फर्टची संकल्पना रूजवण्याचा प्रयत्न करूया. भविष्यातील युवक सक्षम करण्यासाठी सर्व समविचारी संघटनाना जोडून काम करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे विनायक सापळे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते महानंद चव्हाण यांनी मी पूर्ण वेळ सामाजिक काम करण्याठी तयार आहे असे अभिवचन दिले. प्रा. मारोती चव्हाण यांनी युवाईला सक्षम बनविण्यासाठी धर्म-जाती एकता,अन्न वाचवा,चांगला विचार कसा करावा, मनःशांती करिता योगाभ्यास अशा स्वरुपाचे उपक्रम घ्यायला हवेत. या सभेत प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी ऊपस्थितांना राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपुरी आश्रमाचे अद्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. शेवटी आभार प्रा.गणेश टेकळे यांनी मानले.या सहविचार सभेला गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, परेश परूळेकर, गोपुरीचे बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे, कणकवलीतील सादीक कुडाळकर,किरण कदम, तसेच कणकवली महाविद्यालयाचे काही प्राध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page