शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडे तत्त्वावर द्या

गणेश मूर्तिकार आप्पाजी तारी यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे गणेश मूर्ती शाळेच्या इमारतीची पडझड झाल्याने तारकर्ली येथील शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावी अशी मागणी तारकर्ली येथील गणेश मूर्तिकार आप्पाजी श्रीधर तारी यांनी जि प अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्याकडे केल्यानंतर या मागणीची दखल घेत श्री तारी यांना तारकर्ली येथील मत्स्य शाळेची इमारत भाड्याने देण्याचे आदेश सौ सावंत यांनी सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग ) श्री.आंबोकर यांना दिल्यानंतर श्री. आंबोकर यांनी तशा आशयाचे आदेश मालवणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्गमित केले आहेत. त्यामुळे मूर्तिकार तारी यांच्या समोरील गणेश मुर्त्या ठेवण्याचा प्रश्न निकाली पडला आहे तारकर्ली येथील मूर्तिकार आप्पाजी तारी यांच्या गणेश मूर्ती शाळेची एक भिंत यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळली तर छप्परही जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थी सण एका महिन्यावर येऊन ठेपल्याने या मूर्ती ठेवायच्या कुठे हा प्रश्न आप्पाजी तारी यांच्या समोर निर्माण झाला होता. त्यामुळे नजीकच असणारी शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाड्याने मिळावी, अशी मागणी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तारी यांच्या या मागणी बाबत भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी मालवण दौऱ्यावर आलेल्या जि. प. अध्यक्षा सौ. सावंत यांचे लक्ष वेधत पाठपुरावा केलेला होता. तसेच यासाठी भाजपचे कार्यकर्ते भाई मांजरेकर, मंदार लुडबे यांनीही प्रयत्न केले. तारी यांच्या मागणीची दखल घेत सौ. सावंत यांनी मत्स्यशाळेची इमारत तारी यांना भाड्याने दिली आहे. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मालवणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देत तारकर्ली येथील मत्स्य शाळेची इमारत तारी यांना दि. १२ सप्टेंबर पर्यंत अटीशर्तीसह भाड्याने देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मूर्तिकार तारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

You cannot copy content of this page