ओरोस-: राष्ट्रीय धोरणानुसार ऑगस्ट क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक भारती संघटनेने राज्यभर धरणे आंदोलन केले. त्यानुसार सिंधुदुर्ग संघटनेने सुद्धा जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. जिल्हा संघटना व राज्य संघटना अशा दोन गटात हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. माध्यमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय तर जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक समीर परब, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन शेळके, राज्य सदस्य चंद्रकांत चव्हाण, वैभववाडी तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे, दत्ताराम जाधव, देवेंद्र सावंत, ए बी जाधव, हेमंत सामंत, प्रसाद मसुरकर, डी व्ही सामंत, सखाराम मुळे आदींसह अन्य जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची देय रक्कम बिडीएस प्रणालीद्वारे तात्काळ सुरू करावी. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्याना देय वेतन अनुदान द्यावे. शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ निवड श्रेणी मान्यता, पदोन्नती मान्यता ऑनलाईन पद्धतीने सुरू कराव्यात. शालार्थ आयडी देणारी संगणक प्रणाली त्वरित बंद करावी. सहाय्यक व परिविक्षाधीन शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी. २०१८-१९ पासून संच मान्यतेसाठी सुरू केलेली सदोष पद्धत दुरुस्त करावी. ऑनलाईन प्रशिक्षण तात्काळ देण्यात यावे. मयत शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या पाल्याना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी. शिक्षकांना कोविड ड्युटीतून वगळावे. माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन विभागात तुटपुंजा कर्मचारी आहे. त्यामुळे येथे पुरेसा कर्मचारी वर्ग पुरवावा. पाल्याना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळण्यासाठी ४ जानेवारी २०२१ च्या शासन आदेशाची अंमल बजावणी करावी. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयावर लेखापरीक्षक नोंदवत असलेले आक्षेप ही पद्धत बंद करावी. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन आदेशाचे पुनरावलोकन करून शिक्षक संच मान्यता पद्धत कायम करावी. कोरोना बाधित शिक्षकांना विशेष रजा मंजूर करावी, यासंह एकूण १९ मागण्या करण्यात आल्या.
माध्यमिक शिक्षक भारतीने धरणे आंदोलन करीत शासनाचे वेधले लक्ष
