स्टंटबाजी करण्याची सवय आम्हाला नाही;देवा टेमकर यांचा पलटवार
*⚡सावंतवाडी ता.०६-:* स्टंटबाजी करण्याची सवय आम्हाला नाही. स्टंटबाजी कोण करतोय हे सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. आमच्यावर टीका करण्यापूर्वी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी सर्वप्रथम शहरात फेरफटका मारावा, जेणेकरून शहरातील वस्तुस्थिती समोर येईल असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष देवा टेमकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, शहरात पडलेल्या अतिवृष्टीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असून, शहरातील सार्वजनिक आणि खाजगी विहिरीत कलोरिन लिक्वीड तसेच डबक्यांमध्ये आबिंट टाकले गेले आहे का? याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरे कर यांनी सबंधित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी, जर ह्या गोष्टी झाल्या असतील तर त्या नेमक्या कुठे झाल्या याची माहिती जनतेला द्यावी असा टोला लगावला आहे. अतिवृष्टीमुळे शहरात निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे महिन्याभरापूर्वी केलेल्या कामाचे पुरावे दाखवून जनतेची दिशाभूल करू नये. शहरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून, त्यावर काय उपाययोजना करण्यात आली ते जाहीर करावे असे सांगत यामुळे अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे.
