जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची ग्वाही
मालवण दि प्रतिनिधी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर ना. राणे यांनी आपल्याला जो शब्द दिला होता त्या शब्दानुसारच जिल्ह्याला वीस हजार कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा झाला आहे या पुढेही अशाच प्रकारे लस पुरवठा होईल. जिल्हा परिषदेच्या वतीने लसीकरणा बाबत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे मालवण शहराला जास्तीतजास्त लस पुरवठा होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी येथे बोलताना दिली. मालवण दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी आज दुपारी मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्य रणजीत देसाई, जि. प चे बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, संतोष साठविलकर, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, माजी नगराध्यक्ष सुरेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा सरकारे, पूजा करलकर, बाबा परब, डॉ. बालाजी पाटील, डॉ. कुबेर मिठारी, संतोष लुडबे, विजय केनवडेकर, प्रमोद करलकर, हरीश गावकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. सावंत यांनी लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी सुदेश आचरेकर यांनी मालवण शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी लस पुरवठा होत असल्याने लसीकरणा पासून नागरिक वंचित राहत आहेत. शहराबाहेरील व जिल्ह्यातील लोक येऊन लस घेऊन जात असल्याने स्थानिक नागरिक लसीकरणा पासून वंचित राहत असल्याचा आरोप करीत मालवणला लस पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी केली. तर नगरसेवक दीपक पाटकर यांनी ऑनलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने दोन्ही लसीकरण चालू ठेवावे तसेच रात्रौ १० वाजता ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे ती तशीच ठेवावी अशी मागणी श्री. पाटकर यांनी केली त्याला विजय केनवडेकर यांनी दुजोरा दिला. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी आरोग्य विभाग ,प्रशासन यांच्याशी चर्चा मसलत करून प्राधाण्याने मालवण शहराला अधिक डोस उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील तसेच मालवण शहरात वॉर्ड निहाय्य लसीकरण मोहीम राबविण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करू असे त्या म्हणाल्या.
