मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे निवेदन देत वेधले लक्ष
*💫मालवण दि.२०-:* तौक्ते वादळात नुकसान झालेले बरेच मच्छीमार नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे अशा मच्छीमारांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे निवेदन सादर करून केली आहे. आचरा येथील पुणेश तोडणकर, तुकाराम तोडणकर, शंकर गोलतकर, भूषण आंबेरकर, आबा मुणगेकर, रियान मुजावर, नमिता कुमठेकर आणि सर्जेकोट येथील सदाशिव खडपकर यांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मत्स्य व्यवसाय विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तौक्ते वादळात झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे घाईगडबडीत करण्यात आले. एका तासात एकाच ठिकाणी बसून २०० ते ३०० पंचनामे केले गेले, याबाबत स्थानिक मच्छीमार संस्थांना कळविण्यात आले नव्हते असा आरोप यावेळी मच्छीमारांनी करत यामुळे बरेच मच्छीमार सर्व कागदपत्रे असून सुद्धा मदतीपासून वंचित राहिले आहेत असे सांगितले. काही मच्छीमारांनी आपली कागदपत्रे देऊनही त्यांना भरपाई मिळालेली नाही. परवान्याची अट घातल्यामुळे छोटे मच्छीमार आणि खाडी मध्ये मच्छीमारी करणारे मच्छीमार या मदतीपासून वंचित राहिले आहेत. सर्वसाधारण सर्वच मच्छीमारांना वादळाचा तडाखा बसलेला असून सर्वांना मदत मिळाली पाहिजे, सरकारने जी नुकसान भरपाई जाहीर केली, त्यात मदतीपासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांचा विचार करावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
