प्रा.महेंद्र नाटेकर यांच्या कार्याचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच :प्रा .पी.बी.पाटील

*💫कणकवली दि.२०-:* प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रा . महेंद्र नाटेकर यांनी शैक्षणिक , सामाजिक व राजकीय केलेले कार्यप्रेरणादायी व थक्क करुन टाकणारे आहे . त्यांच्या ह्या विधायक कार्याबद्दल त्यांचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे . असे अध्यक्ष पदावरुन बोलताना प्राचार्य डॉ . पी.बी. पाटील म्हणाले . प्रा , महेंद्र नाटेकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त पेन्शनर्स संघटनेने पेन्शनर्स भवनमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी प्राचार्य पाटील बोलत होते.यावेळी मोहन सावंत , दादा कुडतरकर , विश्वनाथ केरकर , अशोक राणे , व्ही.के. चव्हाण , तानवडे सर इत्यादी बहुसंख्य पेन्शनर्स तथा जेष्ठ नागरिक उपस्थित होते . प्रा.पाटील पुढे म्हणाले प्रागतिक माध्यमिक विद्यालय मालवण , रामेश्वर हायस्कूल मिठबाव , कणकवली कॉलेज , कळसुली हायस्कूल , जांभवडे हायस्कूल व कॉलेज येथे सर्वथैव प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शैक्षणिक , सामाजिक व विधायक राजकारण करुन उत्तम कार्य केले . शासनाने त्याची दखल घेऊन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जि.प. सिंधुदुर्ग , महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार केले . शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील , प्राचार्य डॉ . शिवाजीराव भोसले , प्राचार्य डॉ . पी.डी. पाटील यांच्या ‘ महाराष्ट्राचे शिल्पकार ‘ ह्या चरित्रग्रंथात प्रा . महेंद्र नाटेकर यांच्या चरित्राचा समावेश केल्याने प्रा . नाटेकर शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्राचे शिल्पकार झाले . विश्वनाथ केरकर म्हणाले २०१३ साली ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्काराने प्रा . महेंद्र नाटेकरांना गौरविण्यात आले ते सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता अभियानचे प्रचार प्रमुख होते . त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिला जिल्हा १०० % साक्षर झाला . कोकण विकास महामंडळावर डायरेक्टर असताना शेकडो तरुणांना उद्योगधंदे उभे करायला शासनामार्फत आर्थिक मदत केली व अनेकांना नोकऱ्या लावल्या . सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीमध्ये नाटेकर सरांचा मौलिक वाटा आहे. दादा कुडतरकर म्हणाले वृक्षमित्र संघातर्फे गेली तीस वर्षे त्यांनी लाखो वृक्ष लावायला प्रेरणा दिली . ‘ काजू लावा ‘ बांबूला कोकणातून सोन्याचा धूर निघेल . त्या योजनेतून अनेकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याचे सोने केले . नाटेकर सरांनी हजारो काजू , बांबू , आंबा याची मोठी लागवड निर्माण करुन ते बागायदार झाले . श्री.तानवडे म्हणाले , पेन्शनर्स संघटनेमार्फत लोकवर्गणीतून पेन्शनर्स भवन बांधले हे मोलाचे कार्य आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही संघटनेची स्वत : ची एकमेव इमारत आहे . महाराष्ट्र पातळीवरील पेन्शनरांचे अनेक त्यांनी प्रश्न मार्गी लावले . मोहन सावंत म्हणाले पेन्शनर्स भवनला जोडून ‘ माधुरी महेंद्र प्रतिष्ठान ‘ तर्फे ग्रंथालय , वाचनालय , एमपीएससी , आयएसचे मार्गदर्शन केले जाणार आहे . ही सोन्याहून पिवळी गोष्ट आहे . त्यातून समाज अधिक प्रगत होईल . यावेळी प्रा . महेंद्र नाटेकर यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली . सत्काराला उत्तर देताना प्रा.नाटेकर म्हणाले . मला त्याकाळी शासकीय – निमशासकीय अनेक नोकऱ्या मिळत होत्या . पण मला मात्र शिक्षक , प्राध्यापक प्राचार्य बनून विद्यार्थ्यांना स्वत : च्या पायावर उभे करायचे होते . सुसंस्कारीत तरुणांच्या पिढ्या घडवायच्या होत्या . सामाजिक , राजकीय कार्य करायचे होते . ते मी केले . करीत आहे.पैसा मिळवून श्रीमंत होणे हे माझे कधीच ध्येय नव्हते . आणि नाही कार्यानंद हेच माझे ध्येय होते . ते मी साध्य केले करीत आहे . ‘ याचसाठी केला होता अट्टहास ‘ ह्या अलिकडेच प्रसिध्द झालेल्या माझ्या पुस्तक वाचनातून याचीच अनुभूती येईल . शेवटी विश्वनाथ केरकर यांनी आभार प्रदर्शन केले .

You cannot copy content of this page