अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद;खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला यश
*💫कुडाळ दि.२०-:* ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला लवकरच सुगीचे दिवस दिवस येणार असून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीचा विचार करता अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांना ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेला आपला शेतकरी बांधव, त्यांची शेती व्यवसायात असलेली विशेष रुची व शेतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेले नवनवीन प्रयोग विचारात घेता जिल्ह्यातील सिंचनाचे अपूर्ण असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण होऊन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली खाली येणे आवश्यक होते. जिल्ह्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्प निधी अभावी अपूर्ण होते, त्यातील काही कालवे नादुरुस्त असल्याने तर काही कालवे नसल्याने त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळत नव्हते. खासदार विनायक राऊत यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पाना पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या (सन २०२१- २२) च्या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांना ५०५.०५ कोटी एवढ्या भरीव निधीची तरतूद केली आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत यांना पत्राद्वारे त्याची माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने तिलारी (७७ कोटी), कोरले सातनडी (१० कोटी), देवधर (५० कोटी), नरडवे (१७५ कोटी), अरुणा (१५० कोटी), तरंदले (१० कोटी), नाधवडे (५ कोटी), देदोनवाडी (१० कोटी), ओताव (१० कोटी), निरुखे (८ कोटी) ह्या प्रकल्पाचा समावेश आहे.
