पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची मागणी
*💫मालवण दि.२०-:* कोरोना व्हायरसमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना असलेली शासनाच्या भरीव आर्थिक मदतीची व पॉलिसीची गरज ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनात मोंडकर यांनी म्हटले की, गेल्या दीड वर्षात कोरोना व्हायरसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, व्यापारी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक उध्वस्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनासाठी दरवर्षी १५ लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. यावर येथील होमस्टे, लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल, जलक्रिडा, वाहनधारक व्यावसायिकांचा व्यवसाय चालतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे या भागातील व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय देखभाल, कामगार पगार, शासकीय कर, पाणी बिल, लाईट बिल, वाहन कर्ज, गृह व व्यवसाय कर्ज भरणार कुठून हा यक्ष प्रश्न पर्यटन व्यावसायिकांसमोर उभा आहे. देशातील व राज्यातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली, तरी ज्या प्रमाणे घाटमाथ्यावर दूधसंघ, सूतगिरण, साखर कारखाने उभारणीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले गेले व आजही अविरत मदत चालू आहे. त्यांच्या १ टक्केही मदत जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना आजपर्यंत झाली नाही. आज स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी स्वकर्तुत्वातुन जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचे नाव देशविदेशात पोचविले आहे. कोरोना व्हायरसची जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढ होण्यास सुरवात झाली असून पर्यटन व्यावसायिकांचे पुढील आर्थिक नियोजन होणार कुठून हा प्रश्न उभा असून या कठीण प्रसंगात राज्यसरकडून विशेषतः मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडून स्थानिक पर्यटन व्यावसायिकाना मदतीची अपेक्षा असून पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या कामगार हॉटेल देखभाल खर्चासाठी सानूग्रह आर्थिक अनुदान देण्यात यावे, लाईट बिल, शासकीय कर, बँक कर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी, सर्व प्रकारची कर्ज पुनर्गठीत करून गेल्या दोन आर्थिक वर्षातील कर्जावरील व्याज राज्य सरकारने अनुदान स्वरूपात पर्यटन व्यावसायिकांस माफ करावे आणि व्यावसायिकांच्या कर्जाच्या २० टक्के रक्कम येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय उभारण्यासाठी देण्याचे आदेश जिल्ह्यातील बँक, वित्तीय संस्था यांना देण्याचे आदेश राज्यसरकारने द्यावे. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी राज्यसरकारने पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्वतंत्र पर्यटन पॉलिसी स्थानिक जिल्ह्यातील व्यावसायिकांना विश्वासात घेऊन बनविण्यात यावी, व्हर्च्युअल मीटिंगद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी देश विदेशातील टूरआयोजकांनां जिल्ह्यात पर्यटक आणण्यासाठी प्रचार प्रसार करण्यात यावा. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती द्यावी, तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी सरकारच्या पर्यटन महामंडळ व स्थानिक पर्यटन व्यवसायीकांची त्वरित कमिटी गठित करून पर्यटन वाढीचे नियोजन करण्यात यावे, अशा मागण्या मोंडकर यांनी केल्या आहेत.
