कलंबिस्त शिक्षक संजीव मोहितेंचे कुटुंबियांसह बेमुदत उपोषण सुरु

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडले ठाण

*💫ओरोस दि.१९-:* गेली चोवीस वर्षे सेवा बजावलेली असताना, नियमबाह्य अतिरिक्त ठरवून अन्याय करणाऱ्या संस्थाध्यक्ष व सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच गेल्या दहा महिन्याचे थकित वेतन तात्काळ मिळावे. या मागणीसाठी कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक संजीव शंकर मोहिते यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल- कलंबिस्त या प्रशालेत गेली चोवीस वर्षे कार्यरत असलेल्या संजीव शंकर मोहिते या सहाय्यक शिक्षकांवर संस्थेकडून अन्याय करण्यात आला असल्याबाबत संबंधित शिक्षकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये त्यांची पत्नी शैला मोहिते, मुलगी प्रियांका मोहिते व मुलगा प्रतिक मोहिते सहभागी झाले आहेत. या उपोषणाबाबत अन्यायग्रस्त शिक्षक संजीव मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये गेली चोवीस वर्ष कार्यरत असून बिंदु नामावली तील प्रथम क्रमांकाचा एकमेव मराठीचा शिक्षक आहे. सन २०१८- १९ च्या संच मान्यतेनुसार भविष्यातील मिळणारे मुख्याध्यापक पद डावलण्यासाठी नियमबाह्य अतिरिक्त ठरवून संस्थेने अन्याय केला आहे.व बळजबरीने अन्यत्र शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ स्तरापर्यंत हरकती नोंदविल्या असतानाही संस्थेने आकस बुद्धीने माझ्याकडून शैक्षणिक कारभार काढून घेत मस्टर वरून नाव कमी केलेले आहे. तसेच गेल्या दहा महिन्याचे हक्काचे वेतन अडविले आहे.असा आरोप मोहिते यांनी निवेदनातून केला आहे. तर याबाबत शिक्षणाधिकारी, शिक्षक संचालक यांचे संस्थेला आदेश असूनही संस्थेने हजर करून घेतलेले नाही. तसेच वेतनही रोखून ठेवले आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच कलंबिस्त इंग्लिश स्कूल या संस्थेने माझ्यापेक्षा दहा वर्षांनी ज्युनियर असणाऱ्या शिक्षकांची वर्णी लावून सेवा जेष्ठता डावलली आहे. याबाबत न्याय मागण्यासाठी आणि गेल्या दहा महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, मनमानीपणे अन्याय करणाऱ्या संस्था अध्यक्ष व सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी संजीव मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा निर्धार केला आहे.

You cannot copy content of this page