Headlines

आझाद हिंदच्या आंदोलनाला अखेर यश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आपेगाव दिंडीचे झाले प्रस्थान

*💫कणकवली दि.१९-:* आपेगाव येथील माऊली दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने हे प्रस्थान झाले. अशी माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे, कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांनी दिली माऊली जन्मभूमी आपेगावच्या 842 वर्षांच्या माऊली माता-पिता दिंडी प्रस्थान सोहळ्याला परवानगी देण्यात यावी यासाठी आझाद हिंद संघटनेने राज्यव्यापी निवेदन देऊन आंदोलन उभे केले होते.तर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी थेट मंत्रालयासमोर आणि माऊली जन्मभूमी आपेगावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर दादा यांच्यासह महाराष्ट्रातील हजारो वारकऱ्यांनी १२ जुलैलाक्ष माऊली जन्मभूमीतच सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला होता . परंतु ११ जुलै रोजी शासन प्रशासनाने माऊली जन्मभूमीत हजेरी लावत चार दिवसात परवानगी मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले.त्यामुळे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर माऊली जन्मभूमी दिंडी प्रस्थान सोहळ्या संदर्भात खासदार संजय बंडु जाधव, खा.भावनाताई गवळी, ना.रावसाहेब दानवे, ना.एकनाथ शिंदे, ना. संदिपान भुमरे,ना.अब्दुल सत्तार,आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा घडवून आणत सदर परवानगी मिळविण्यासाठी शासन दरबारी मागणी लावून धरली. त्यामूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माऊली जन्मभूमी आपेगाव संस्थानचे विश्वस्त आणि आझाद हिंद संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. सदर बैठकीनंतर त्वरित औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांना माऊली जन्मभूमी आपेगाव दिंडी प्रस्थानला परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे भक्तगण, महाराष्ट्रातील सर्व अध्यात्मिक संस्थाप्रमुख व आझाद हिंद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संघर्षमय आंदोलनाला अखेर यश मिळाले. महाराष्ट्रातील वारकरी व आझाद हिंद संघटनेचे पदाधिकारी माऊली दिंडी प्रस्थान सोहळ्याच्या अलौकिक पुण्यकर्माचे आणि आंदोलनाच्या विजयाचे साक्षीदार झाले,याचा मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे, कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांनी दिली.

You cannot copy content of this page