*विकासाच्या दृष्टीने राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला जनतेची पसंती;दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले मत
*💫दोडामार्ग दि.१९ सुमीत दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात सत्तास्थाने असलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा डाव येथील सुज्ञ जनतेने ओळखला असून विकासाच्या दृष्टीने राज ठाकरे यांचे नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला जनतेची पसंती असून मोठ्या आशेने पर्याय म्हणून या पक्षाकडे जनता पाहत आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुनील गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रसिद्धी पत्रकात गवस यांनी म्हटले की, शिवसेना-भाजप हे एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र होते. आजपर्यंतच्या सर्व निवडणुका त्यांनी एकत्र लढवल्या. पण सत्तेच्या स्वार्थापायी भाजपची राष्ट्रवादी पक्षा सोबतची पहाटेची युती, आणि लगेचच सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केलेली अभद्र युती त्यामुळे सर्व राज्यातील जनता ह्या दोन्ही पक्षांची श्रेयवादाची पोकळ लढाई चालली आहे हे ओळखून आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात शिवसेना मित्र पक्ष असताना खरंतर तुम्ही विकासाची गंगा वाहिली पाहिजे ते सोडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करण्यात दोन्ही पक्ष मग्न आहेत पेट्रोल डिझेलच्या दरांनी आज शंभरी पार केली आहे. स्वयंपाक गॅसचे दर हजाराच्या आसपास येऊन ठेपले. त्यामुळे आज लोकांना अच्छे दिन काय असतात ते कळून चुकले आहे. इकडे राज्य सरकारच्या कुचकामी आरोग्य यंत्रणा, भरमसाठ विजबिले, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, पूरस्थिती, जनतेच्या मूलभूत गरजा, वाढती महागाई ह्यामुळे जनता पूर्णपणे कंटाळली आहे. त्यामुळे आज दोडामार्ग तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आजपर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवुन निवडुन दिले तेच आज सत्तेच्या स्वार्थासाठी बदलले व इतर पक्षात गेले. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात सत्तास्थाने असलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांना माहिती आहे की आता विकास आपल्याकडे होणार नाही. निवडणुका जवळ आलेल्या आहेत आता सुज्ञ जनतेने आपला डाव ओळखला आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याकरवी ते भर चौकात आमनेसामने येऊन प्रसिद्धी मिळवत आहेत. परंतु सुज्ञ जनता राज ठाकरे यांचे नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाकडे मोठ्या आशेने पर्याय म्हणून पाहत आहे, असे गवस यांनी सांगितले आहे.
