सा.बां. कार्यालयालगतच्या नागरिकांना दिलासा;पाणी निचरा समस्या मार्गी लागणार

नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ठेकेदार कंपनीला सूचना

*💫​कणकवली दि.१९-:* कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी सुमारे ​१० ते ​१५ फूट साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नव्हता. हायवे ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे हे पाणी निचरा होत नव्हते. त्यामुळे बांधकाम कार्यालय व तेथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत मुसळधार पावसामुळे साचलेले पाणी व त्यामुळे होणारा त्रास ठेकेदार कंपनीच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तातडीने हे काम आज हाती घेत मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. कणकवलीत सार्वजनिक बांधकाम कार्यालयानजीक गेली तीन वर्षे सातत्याने साचत असलेले पाणी निचरा करण्याबाबत वारंवार आश्वासन देऊन देखील कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदार कंपनीच्या मेंटेनन्स विभागाचे अभियंता धीरज पाटील यांनी आज सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व तातडीने हे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सदर पाणी निचरा होण्यासाठी सुमारे आठ ते दहा फुटापर्यंत चर खोदून त्यामध्ये पाईप घालून पाणी निचरा करणे असा कायमस्वरूपी मार्ग काढा अशी सूचना केली. तर बांधकाम विभाग कार्यालय ते तेथील नाल्यापर्यंत पाईप घालताना मध्ये येणारी पिकअप शेड हटविण्याबाबत सूचना देण्यात आली. सदर पिकअप शेड हटविण्याबाबत कार्यकारी अभियंता यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला असल्याचे​ ​नलावडे यांनी सांगितले. तर सदर पाईप घातल्यानंतर लगतची माती कोसळून पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये याकरिता रिटनिंग वॉल देखील करण्याची सूचना हर्णे यांनी दिली. त्यावर आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही करतो अशी ग्वाही अभियंता धीरज पाटील यांनी दिली. तसेच येत्या दोन दिवसात हे काम मार्गी लावले जाईल असे आश्वासन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे गणपतीसाणा येथे देखील काही प्रमाणात पाणी साचले होते. तसेच तायशेटे हॉस्पिटलकडेही साचलेले पाणी निचरा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली असून, शहरात कालच्या मुसळधार पावसामुळे जी स्थिती निर्माण झाली होती त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे नलावडे व हर्णे यांनी सांगितले. गोकुळधाम हॉटेलकडील नाल्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. त्या करीता ठेकेदार कंपनीला सूचना देण्यात आल्या असून नगरपालिकेमार्फतही नाल्याच्या जुन्या पाइपच्या ठिकाणी काही भाग मोकळा करण्यात आल्याची माहिती नलावडे यांनी दिली. ​​

You cannot copy content of this page