तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

पालकमंत्री उदय सामंत

*💫ओरोस दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीडचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रासह अकरा आरोग्य उपकेंद्रांना शासनाने नव्याने मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोविड बाबत उपाय योजना, पर्जन्यवृष्टी आणि नवीन उपक्रमाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते .यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खेड्यापाड्यात निर्माण व्हावी. ग्रामीण भागातील जनतेची सोय व्हावी. यासाठी आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र व ११ आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, व माड्याचीवाडी, गोवेरी, आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे तर सावंतवाडी तालुक्यात भोम-कोलगांव , सोनुरली, दोडामार्ग तालुक्यात मोरगाव, वझरे, घोडगे वाडी, वेंगुर्ला तालुक्यात रेडी नंबर-२ ,पेंडूर, कांबळेवीर आणि कणकवली तालुक्यातील असलदे, या आरोग्य उपकेंद्र यांना मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाला सादर करण्यात आले होते. या तोक्ते वादळाच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५ कोटी ४९ लाखाचा निधी दिला आहे. तो तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. ही नुकसान भरपाई लवकरच लाभार्थींपर्यंत पोहोच होईल. असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोवीडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून केंद्राकडून लसीचा पुरवठा किती होतो त्यावर लसीकरणाचा वेग अवलंबून राहणार आहे. आता केंद्रात जिल्ह्यातील मंत्री आहेत तेव्हा लसीचा पुरवठा वाढेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. असा टोलाही यावेळी नारायण राणे यांचे नाव न घेता उदय सामंत यांनी लगावला. कोरोना ची तिसरी लाट येणार हे गृहीत धरून जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आले आहे. आवश्यक बेड्स, ऑक्सिजन साठा कमी पडणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे . गणेशोत्सव कालावधीत कोरोनाची साथ पुन्हा वाढू नये याबाबत खबरदारी घेत असताना गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणारे चाकरमानी आणि स्थानिक लोक याना कोणताही त्रास होणार नाही, गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेत नियमावली तयार करण्यात येणार आहे. आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल. असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page