मडुऱ्यात मगरीच्या हल्ल्यात गाभण म्हैस जखमी

*💫बांदा दि.०९-:* मडुरा – डिगवाडी येथील शेतकरी संतोष लक्ष्मण खर्डे यांच्या गाभण म्हैशीवर नदीत मगरीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात म्हैशीच्या उजव्या डोळ्यानजीक व डाव्या कानावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शेतकरी संतोष खर्डे हे म्हैशीना पाण्यासाठी नदीवर घेऊन गेले असता दबा धरुन बसलेल्या मगरीने अचानकपणे गाभण म्हैशीवर हल्ला चढविला. उजव्या बाजूने डोळ्यानजीक झालेल्या हल्ल्यातून बचावल्यानंतर आक्रमक मगरीने डाव्या बाजूने उडी घेऊन कानाकडे पकडले. यावेळी संतोष खर्डे यांनी आरडाओरड केल्यानंतर मगर पाण्यात गेली. त्यांनी प्रसंगावधान दाखविताना आपला जीव धोक्यात घालून तातडीने अन्य गुरांना पाण्याबाहेर काढले. मडूरे उपसरपंच विजय वालावलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या दुर्घटनेची माहिती सावंतवाडी वनपाल गजानन पानपट्टे यांना दिली. मडूरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद रिक्त असल्याने शेतकर्‍यांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्याची पाळी आली आहे.

You cannot copy content of this page