केंद्रीयमंत्री नारायण राणे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार लोकार्पण; नगराध्यक्ष राजन गिरप यांची माहिती
*💫वेंगुर्ले दि.०९-:* वेंगुर्ला शहरातील बहुचर्चित अशा सुसज्ज मच्छिमार्केट इमारतीचे ११ जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे. गेली कित्येक वर्षे वेंगुर्लेवासीयांना प्रतीक्षा असलेल्या व बाहुचर्चित असलेल्या वेंगुर्ला मच्छिमार्केटचे लोकार्पण ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण होणार आहे. यावेळी लोकार्पण ठिकाणी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी श्री जोशी, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी वैभव साबळे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासहित भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, काँग्रेस बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मच्छिमार्केटचा अभ्यास करून त्यात राहिलेल्या त्रुटी लक्षात घेऊन हे मच्छिमार्केट उभारण्यात आले आहे. यात रेन वोटर हार्वेस्टिंग, फायर हायड्रेट सिस्टीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या मच्छिमार्केट मधील सांडपाणी हे प्रक्रिया होऊन गटारात सोडले गेल्यामुळे स्वछतेबाबतही योग्य काळजी घेण्यात आलली आहे. तसेच याठिकाचा कचरा गोळा करून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील कचरा थेट पार्किंग मध्ये बसवण्यात आलेल्या ट्रॉलीमधे जाणार आहे. दिव्यांग व वयोवृद्ध यांच्यासाठी रॅम्प व लिफ्ट ची व्यवस्था ही करण्यात आली आहे. तसेच सुसज्ज पार्किंग, चेंजिंग रूम, प्रत्येक माळ्यावर शौचालय व बाथरूम ची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर आदी उपस्थित होते.
