कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील

चला ज्योत जागवूया कार्यक्रमात डॉ लता मोरे यांचा आशावाद

*💫मालवण दि.०९-:* कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला मारक आहे. लवकरच कोरोनाचे संकट टळून शाळा पूर्ववत सुरू होतील, असा आशावाद डॉ. लता मोरे यांनी व्यक्त केला. मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, मुंबई व मुलखी शाखा यांच्यातर्फे ‘चला ज्योत जागवूया’ या उपक्रमांतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांचे पूर्ण लॉकडाऊन संपल्यानंतर भवितव्य काय असेल? या विषयावर डॉ. मोरे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. मोरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी किती गुण मिळविले. याकडे सातत्याने लक्ष दिले जाते. परंतु तो विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी भावनिक विकास महत्वाचा आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना भावनिक विकास होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचा भावनिक विकास झाला, तर ते जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या विकासात ८० टक्के वाटा हा भावनिक बुद्धिमत्तेचा असतो. कोरोना कालावधीत शासनाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. यूजीसीच्या मार्गदर्शनानुसार केवळ ४० टक्के शिक्षण ऑनलाईन पद्धतीने, तर ६० टक्के शिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेणे आवश्यक आहे. म्हणजे ऑनलाईन शिक्षण हे परिपूर्ण नाही. आपली शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्री आहे. त्यात विद्यार्थ्याचा भावनिक, बौद्धिक, शारीरिक विकास होणे अपेक्षित आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम, मुलखी शाखा अध्यक्ष राजेंद्र हरी कदम, आनंद तांबे तसेच कार्यकारिणी सदस्य आदींचे योगदान लाभले.

You cannot copy content of this page