डोंगरपाल येथे सावंतवाडी तालूका कृषि मेळावा संपन्न

सावंतवाडी-: सावंतवाडी हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती श्री माऊली मंदिर डोंगरपाल येथे तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी, पंचायत समिती सावंतवाडी व ग्रुप ग्रामपंचायत डिंगणे यांचे संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत यांनी प्रास्ताविक केले. काजू पिकांवरील कीड व खत व्यवस्थापन याबाबत कृषी सहाय्यक यशवंत सावंत यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. रविंद्र मडगावकर यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीची कास धरावी असे पंचायत समिती सदस्य श्री कृष्ण सावंत यांनी सांगितले. तर पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर यांनी महिलांना शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हळद लागवड करणे व त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून हळद लागवड करावी असे सांगितले. गटशिक्षण अधिकारी वासुदेव नाईक यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी स्थानिक उत्पादने उत्पादित करण्याचे सुचविले. तर प्रभारी सभापती शितल राऊळ यांनी आजच्या कृषी दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर श्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड कामाचा शुभारंभ, बचतगटामार्फत हळद लागवड प्रात्यक्षिकास भेट इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page