ग्रामस्थांची तहसिलदारांकडे मागणी
वैभववाडी प्रतिनिधी कोकिसरे नारकरवाडी येथील अतिक्रमण करण्यात आलेला रस्ता खुला करा या मागणीचे निवेदन नारकरवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिले. रस्ता खुला न झाल्यास उपोषणाचा इशारा निवेदनातून ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोकिसरे नारकरवाडी ते वैभववाडी दत्त मंदिर रस्ता अशी नोंद असलेला हा रस्ता अतिक्रमण करून प्रकाश रामचंद्र पवार रा. वैभववाडी यांनी बंद केला आहे. त्यांनी सदर.रस्त्यात जेसीबी ने खोदकाम करून चिरे लावून घेतले आहे. या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निधी खर्च झाला आहे. तो रस्ता संबंधित व्यक्तीने बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर रस्ता तात्काळ खुला करून द्या. अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती. कार्यवाही न झाल्यास 30 जून रोजी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. दरम्यान तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन माहिती जाणून घेतली. व योग्य तो तोडगा काढला आहे. तहसीलदार यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आणि तात्पुरते उपोषण मागे घेत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप नारकर, सदस्य अवधूत नारकर, सदस्य समीक्षा पाटणकर, दाजी पाटणकर, रमेश नारकर व ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.
