लॉकडाऊन कालावधी बेकायदेशीर दारू वाहतुकीस ठरतेय पर्वणी

प्रशासनाने अनेकवेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष;जिल्हा मद्यविक्रेता अध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप

*💫मालवण दि.२६-:* सध्या मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू वाहतूक, विक्री यासह केमिकल युक्त दारूचा सुळसुळाट वाढला असून याकडे उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलीस यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष केल्याने बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यासाठी लॉक डाऊनचा काळ ही एक जणू पर्वणी ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यात उमटू लागली आहे दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्यविक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांनी याबाबत प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले असून केमिकल युक्त दारूच्या प्राशन केल्याने अनेकजण आजारी पडत आहेत किंबहुना त्याचे बळीही ठरले आहेत यापुढे तरी प्रशासनाने तात्पुरती दिखाऊ कारवाई न करता आपल्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी केली आहे गेल्या दोन महिन्यात लॉकडाऊनमुळे मालवणातील बार व देशी दारू व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने अवैध दारू विक्रीला पेव फुटल्याचे चित्र असून काही जण आड मार्गांनी व पोलिसांची नजर चुकवत चोरट्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक मालवणसह जिल्ह्यात करीत असल्याची तसेच काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूची अवैध विक्रीही वाढल्याची खुलेआम चर्चा सुरू आहेया चर्चेनंतर या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग एखाद दुसरी कारवाई करण्यात धन्यता मानीत आहेत तर सध्या लॉकडाऊन काळात बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असणाऱ्या पोलीस यंत्रणेनेही या अवैध दारू वाहतूक व विक्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे गतवर्षीच्या कडक लॉकडाऊन मध्ये ज्या प्रमाणे प्रत्येक गाडीची तपासणी केली जात होती, त्याप्रमाणे कोणतीही तपासणी पोलिसांकडून होत नसल्याने अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांचे आणखीनच फावल्याचे बोलले जात असून अलीकडेच मालवणच्या रॉक गार्डन परिसरातील खडकाळ भागात बियर व दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडल्याचे दिसून आले होते. रॉक गार्डनला लागूनच असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या आसपासच्या परिसरातच अशाप्रकारे दारूच्या बाटल्यांचा खच पडत असेल तर पोलीसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याबाबत व केमिकलयुक्त दारूच्या विक्रीबाबत जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांनीही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. लॉकडाऊन काळात मालवणात गोवा बनावटीची व अन्य काजू दारू अनधिकृतपणे मालवणात आली व त्याची विक्रीही झाली. महिन्याभरात मालवणात काही मृत्यू या केमिकलयुक्त दारूमुळे झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तालुक्यात किनारपट्टी भागात विक्री होणाऱ्या यातीलच केमिकलयुक्त दारू पिऊन कित्येकजण आजारी पडले असून अनेकांच्या पायाला आलेली सूज हा चर्चेचा विषय आहे या सर्व प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष शेखर गाड यांनी केली आहे.

You cannot copy content of this page