विजेच्या खेळखंडोब्याने तारकर्ली ग्रामस्थ हैराण;

ठिय्या आंदोलनाचा इशारा

*💫मालवण दि.२५-:* तौक्ते वादळानंतर वीज पुरवठा खंडित होऊन आठ दिवस अंधारात राहिलेल्या तारकर्ली गावातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरही गेले अनेक दिवस सातत्याने वीज पुरवठ्याचा खेळ खंडोबा सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वीज पुरवठा नियमित करण्यात वीज वितरण विभाग दुर्लक्ष करत आहे. येत्या पंधरा दिवसात तारकर्ली गावातील विजेचा खेळ खंडोबा थांबला नाही तर मालवण वीज वितरण कार्यालयासमोर ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करतील अस इशारा तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. तारकर्ली गाव तौक्ते वादळात आठ दिवस पूर्ण अंधारात राहिल्यावर गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन वादळात पडलेले वीज पोल ,तुटलेल्या वीज तारा पुन्हा सुरळीत करण्याकरिता कंत्राटी वीज कामगारांच्या खांद्याला खांदा लावून या गावाचे लाईनमन श्री. आंबेरकर यांच्या काम केले. त्यानंतरया गावातील वीज पुरवठा हळू हळू सुरळीत झाला. मात्र गेले अनेक दिवस गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन खेळखंडोबा चालू आहे. असे असताना वीज बिले मात्र भरमसाठ येत असून ती भरण्याकरिता मात्र तगादा असतो. लाईट ये -जा करीत असल्याने काहींचे विद्युत उपकरणे खर्चिकला आली व येत आहेत. याला जबाबदार मालवण महावितरणचे संबधित अधिकारी आहेत काय? या गावातील संपूर्ण लाईन जीर्ण झाले त्याकडेही कोणाचा लक्ष नसून त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. याविभागाच्या असिस्टंट इंजिनियर यांना विचारणा केली तर काम चालू आहे, फॉल्ट आहे अशी उत्तरे मिळतात. म्हणजेच आज महिनाभर लाईटचा फॉल्टच त्यांना भेटत नाही. लाईट जाण्याने तारकर्ली ग्रामस्थ ग्राहक हैराण झाले आहेत. येत्या पंधरा दिवसात लाईटचा खेळ खंडोबा थांबला नाही तर तारकर्ली नागरिक मालवण कार्यालयात कोविड १९ चे नियम पाळून ठिय्या आंदोलन करतील, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे, असेही सुरेश बापर्डेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page