*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात, आंतरराष्ट्रीय योग दिन, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने योगासने व ध्यान करून साजरा केला. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होता. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. तेजल कुडतरकर ही प्रशिक्षिका तर ध्यानसत्राचे प्रशिक्षक श्री. प्रशांत हाटकर सहा. प्राध्यापक या प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिस्टिक वेलनेस’ ही संकल्पना माजी मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांनी महाविद्यालयात रुजवली. या अंतर्गत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनात्मक विकास साधण्यासाठी खेळ, योगासने, ध्यानाचे उपक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ औचित्य साधून विद्यार्थ्यां सोबत शिक्षक, पालक यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा म्हणून महाविद्यालयात ध्यान व योगासनाची सत्रे आयोजित करण्यात आली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून योगासने केली. तर महाविद्यालयात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन व सरकारच्या नियमांचे पालन करीत शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने योगा व ध्यानाचे धडे गिरवले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्राध्यापक हेमंत महाडिक चेतन नेमण, श्रीमती मुग्धा कामत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नरेश शेट्ये यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयाचे समन्वयक श्री. श्रीपाद वेलींग यांनी मार्गदर्शन केले.
दळवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
