*💫बांदा दि.२५-:* निगुडे-देऊळवाडीतील अंतर्गत रस्त्यावर चार दिवसांपूर्वी मोठाले भगदाड पडले होते. गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाने सदर धोकादायक खड्डा बुजविल्याने तात्पुरता तरी धोका टळला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरुपी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. चारदिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निगुडे-देऊळवाडीतील अंतर्गत रस्त्याला भगदाड पडले होते. वाडीतील बापू गावडे, मनोहर नाईक व आदेश सावळ यांनी पुढाकार घेत श्रमदानातून खड्डा बुजविला. तसेच रस्त्यासंबंधी असलेल्या समस्या ग्रामपंचायतीने सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी रस्त्याची पाहणी करत येणाऱ्या मासिक बैठकीत रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने घेऊ व त्याचा पाठपुरावा करत निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
निगुडे-देऊळवाडीतील भगदाड श्रमदानातून बुजविले
