जिल्ह्यातील ग्रंथालये होणार सुरू !

पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे आदेश

मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश सध्या स्तर ३ मध्ये आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू झालेल्या नियमावलीनुसार २१ ते २८ जून या कालावधीत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रंथालये सुरू करण्याचे आदेश जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने संबंधित सर्व ग्रंथालयांना दिले आहेत. दोन ते अडीच महिने ग्रंथालये बंद होती. दरम्यान, ग्रंथालये सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त झाले असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले. प्रशासनाने ठरवून दिलेले दिवस आणि वेळ यानुसार नियोजन करून ग्रंथालयांचे कामकाज सुरू ठेवले जाणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, ग्रंथालयांच्या सेवा सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास नजीकच्या शासकीय यंत्रणेस व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ग्रंथालय व्यवस्थापनाने विनाविलंब अवगत करणे बंधनकारक आहे. त्याबाबत स्थानिक शासकीय यंत्रणेकडून प्राप्त निर्देशानुसार किंवा शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या कालावधीसाठी ग्रंथालय सेवा स्थगित ठेवण्यात यावी, असे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

You cannot copy content of this page