*💫मालवण दि.२३-:* महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे विदारक स्थिती असून ती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोनाची पहिली लाट सर्वांच्या सहकार्याने आटोक्यात ठेवली असताना दुसऱ्या लाटेत मात्र जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी ईश्वरी सेवा समजून काम केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी हडी येथे बोलताना केले. भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यावतीने मालवण आणि कुडाळ तालुक्यात मास्क व ऑक्सिमिटरचे वाटप करण्यात येत असून या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी दुपारी हडी ग्रामपंचायत कार्यालय येथे झाला. यावेळी जिल्हा परिषद मसुरा विभागातील ग्रामपंचायतींना आम. शेलार यांच्यातर्फे मोफत ऑक्सिमीटर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी आम. शेलार यांच्यासह भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभाकर सावंत, हडी सरपंच महेश मांजरेकर, बाब परब, विलास हडकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, नगरसेवक गणेश कुशे आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सरपंच महेश मांजरेकर यांनी स्वागत करत हडी ग्रामपंचायततीने राबविलेल्या विकसात्मक उपक्रमांबाबत व कोरोना काळात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर अतुल काळसेकर यांनी आम. शेलार यांच्या ऑक्सिमीटर व मास्क वाटपाच्या उपक्रमाबाबत माहिती देत मालवण व कुडाळ तालुक्यात ४०० ऑक्सिमीटर व २५ हजार मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढ व मृत्यूदर याबाबत विदारक परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्हाही रेडझोन मध्ये असून रुग्ण संख्या वाढत आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणी महत्त्वाचे असताना ग्रामीण भागात ऑक्सिजन तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिमीटरची कमतरता जाणवते म्हणूनच या महामारीच्या काळात आपल्या लोकांना मदत करण्यासाठी मी ऑक्सिमिटर व मास्कचे वाटप करत आहे. ईश्वर ही सेवा समजून मी हे काम करत असून सर्वांनीच ईश्वर ही सेवा समजून या संकटकाळात मदत करावी. कोरोना नियंत्रणात येण्याबरोबरच कोरोना नंतरचे आजारही जिल्ह्यात उद्भवता नये याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरणा शिवाय पर्याय नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली असून आज गावागावात लस पोहोचली आहे असेही आम. शेलार म्हणाले. आभार विलास हडकर यांनी मानले. यानंतर आम. आशिष शेलार यांनी चिंदर ग्रामविलगीकरण कक्ष, आचरा ग्रामविलगीकरण कक्षास भेट देऊन तिथेही मास्क व ऑक्सिमीटरचे वाटप केले.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी ईश्वरी सेवा समजून काम करावे – आम. आशिष शेलार
