गुन्हा दाखल करून केली अटक
*💫देवगड दि.२०-:* घरात कोणी नसल्याचे संधी साधून पाणी मागण्याचा बहाण्याने घरात जावून मिठबांव भोजनेवाडी येथील शुभांगी दाजी जेठे(७८) वृध्देचे तिला खाली ढकलून दागीने लुटून पळ काढणाऱ्या मिठबांव येथीलच रेणूका फाटक(२५) या संशयित चोरट्या महिलेला देवगड पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले आहे. चोरीची घटना १९ जुन रोजी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मिठबांव भोजनेवाडी येथील शुभांगी दाजी जेठे(७८) ही महिला तिच्या मुलासमवेत घरी राहते. १९ जुन रोजी त्यांचा मुलगा ट्रॅव्हलर्स बुकींग कामासाठी गेला. त्यामुळे त्या घरात एकट्याच आहेत ही संधी साधून तोंडाला मास्क लावून एका अनोळखी महिलेने त्यांचा घरात प्रवेश केला व त्यांच्याकडे पाणी पिण्यास मागीतले. पाणी आणण्यासाठी शुभांगी जेठे या घरात गेल्यानंतर त्यांचा मागोमाग घरात जावून त्या अनोळखी महिलेने त्यांना बाथरूममध्ये पाडले व त्यांच्या गळ्यातील १५ हजार रूपये किमतीची सव्वा तोळ्याची सोन्याची चैन व २० हजार रूपये किमतीचे सव्वा तोळे वजनाची सोन्याची माळ काढून पोबारा केला. या भीतीने त्या वृध्द महिलेने तात्काळ मुलाला फोन करून सांगीतले. त्यानंतर देवगड पोलिस स्टेशनला येवून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादवि ३९२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासामध्ये शुभांगी जेठे यांनी संशयित महिलेची हालचाल व वर्णन सांगीतल्यानंतर सदर महिला ही मिठबांव येथीलच रेणुका फाटक असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या महिलेल्या २४ तासाच्या आतच गजाआड केले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरून नेलेले सर्व दागीने तिच्याकडून हस्तगत केले आहे अशी माहिती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. या चोरीचा तपास अेएसआय दशरथ चव्हाण, पो.कॉ.स्वप्नील ठोंबरे, महिला पो.कॉ.प्रणाली झेमणे करीत आहेत.
