नगरपालिकेने अग्निशमन बंब खरेदी करावा

मालवण व्यापारी संघाची नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडे मागणी

*💫मालवण दि.२०-:* मालवण बाजारपेठेत आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? नगरपालिकेकडे अग्निशमन वाहन नसल्याने आग लागून मोठी झळ सर्वांनाच पोहोचू शकते. या सर्वांचा विचार करता, मालवण पालिकेच्या माध्यमातून अग्निशमन ‘वाहन लवकरात लवकर घेऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघातर्फे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन करण्यात आली.. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, रवी तळाशिलकर, गणेश प्रभूलकर, दीपक केळुसकर, सरदार ताजर, हर्षल बांदेकर, उमेश शिरोडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, सन्मेश परब आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, मालवण शहरासाठी अग्निशमन वाहनाची तातडीची गरज आहे. गेली दोन वर्षे पालिकेकडे अग्निशमन वाहन व्यवस्थाच नाही. शहरात पावसाळ्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. दोन दिवसांपूर्वी येथील सोमवार पेठ येथे दुपारी एका बंद दुकानामध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली होती. दिवसाची लागल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आले. आग विझविण्यासाठी व्यापारी बांधवांनीच मेहनत घेतली. नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. कदाचित रात्रीच्यावेळी आग लागल्यास मोठी दुर्घटना घडून वित्त व मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. दोन दिवसांपूर्वी आगीची घटना घडल्यावर अग्निशमन गाडीची शहराला नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. बाजारपेठेसह शहराच्या आजूबाजूचा भाग येथे अग्निशमन बंबाचा मोठा उपयोग होऊ शकतो. अग्निशमन गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवून त्याचा त्वरित पाठपुरावा करावा. आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अग्निशमन गाडीची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघाने केली आहे.

You cannot copy content of this page