हळद बियाणाचे शास्त्रीय पद्धतीने लागवड करुन व्यवसायिक फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा

*सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अध्यक्ष अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन*

*💫मालवण दि.१९-:* गतवर्षीपासून जिल्ह्यात हळद लागवड उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षीही हळद लागवड उपक्रमावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत हळद बियाणांचे वाटप करण्यात येत असून शेतकरी, महिला बचत गट यांनी शास्त्रीय पद्धतीने लागवड करून व्यावसायिक फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे प्रतिपादन सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे बोलताना केले सिंधु हळद क्रांती अभियानातंर्गत हळद बियाणे वाटपाचा शुभारंभ आज मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, विलास हडकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, महेश मांजरेकर यांच्यासह उमेदच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी आम. रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायांची गरज असून येथील शेतकऱ्यांना सधनतेकडे नेण्यासाठी हळद हे एक उत्तम पीक आहे. या दृष्टिकोनातून हळद लागवडीवर भर देण्यात आला आहे जे शेतकरी, महिला बचत गट यामध्ये सहभाग घेतील त्यांना पुढील काळात चांगले उत्पन्न मिळू शकेल. हळद लागवडीतून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.तर डॉ. प्रसाद देवधर यांनी हळद पिकाच्या लागवडीबाबत त्यातून मिळणारे उत्पन्न याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना हळद बियाणांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी केले तर आभार सभापती श्री.पाताडे यांनी मानले.

You cannot copy content of this page