*💫कणकवली दि.१९-:* मालवण तालुक्यातील श्रावण गावातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी श्रावण ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील सर्व नागरिकांना एन् ९५ मास्कचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोना विषाणू प्रसाराची सरासरी शून्यावर आणण्यासाठी पॉझिटिव्ह व्यक्तींच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी वाफ देण्याच्या मशीनचेही वाटप करण्यात येत आहे. ग्राम कृती कमिटीच्या पथकाच्या माध्यमातून मशीन वर वाफ घेण्याच्या पद्धतीबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. तर रोजच्या रोज पॉझिटिव्ह व्यक्तींना धीर देऊन कोरोना मुक्तीसाठी उपचारात्मक मदत केली जात आहे. या पद्धतीमुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींसह कुटुंबातील सदस्यांप्रमाणे गावातून समाधान व्यक्त केले जात आहे. मास्क आणि वाफेच्या मशीनच्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत श्रावण येथे करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर प्रथम गरजवंत नागरिकांना मास्क आणि वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत परब यांनी श्रावण गाव १००% कोरोना मुक्त केला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच याकामी राबणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. या वाटप कार्यक्रमाला सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, झोनल ऑफिसर नितीन कदम, ग्रामसेवक व्हि व्हि रावले, आरोग्य सेविका सूनिता डवरी, आशाताई सुहासिनी पंधारे, ग्रामपंचायत कर्मचारी बापू परब, रंजन पवार, मोहन परब तर ग्रामस्थ प्रकाश बागवे, अनिल पवार, हरी पवार, प्रकाश येरम, गणेश चव्हाण तसेच माजी सरपंच दुलाजी परब, विशाखा परब आणि वसंत परब उपस्थित होते.
श्रावण ग्रामपंचायतीच्यावतीने मास्क आणि वाफेच्या मशीनचे वाटप
