आतापर्यंत 288 जणांच्या करण्यात आल्या टेस्ट
मालवण दि प्रतिनिधी गेल्या काही दिवसात मालवण शहरात कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण असताना मालवण नगरपालिकेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरात आरटीपीसीआर टेस्टची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध भागांतील वस्त्यांमध्ये, रहिवासी संकुलमध्ये तसेच मोक्याच्या नाक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात आतापर्यंत एकूण २८३ जणांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ११० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून १७३ जणांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत. मालवण शहरात आरटीपीसीआर टेस्टची मोहीम ७ जून पासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी एक पथक नियुक्त केले आहे. यामध्ये टेक्निशियन श्री. परब यांच्यासह नगरपालिका अधिकारी गीतांजली नाईक, कर्मचारी मिथुन शिगले, बसत्याव फर्नांडिस, राकेश नरे, निलेश घाडगे यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात १० जणांची टेस्ट करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बस स्टॅण्ड मागील बौद्धवाडी मध्ये दोन दिवसात एकूण ८५ टेस्ट करण्यात आल्या, त्या सर्व निगेटिव्ह आल्या. वायरी तानाजी नाका येथे करण्यात आलेल्या १५ जणांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. बांगीवाडा येथील सिंधुसागर प्लाझा मधील १८ जणांची टेस्ट करण्यात आली मात्र रिपोर्ट अद्याप प्राप्त नाहीत. धुरीवाडा येथील समर्थ कृपा कॉम्प्लेक्स मध्ये करण्यात आलेल्या १७ जणांच्या टेस्टचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. तर बाजारपेठेत गेल्या शनिवारी ५५ तर रविवारी २७ टेस्ट करण्यात आल्या, त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. रेवतळे फाटक शाळा येथे ५ जणांची तर देऊळवाडा प्राथमिक शाळा येथे २ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. तर गवंडीवाडा येथील संकल्प कॉम्प्लेक्स मध्ये ११ जणांची, धुरीवाडा येथील कोरल रेसिडन्सी व संस्कृती पार्क मधील एकूण १२ जणांची तर समर्थ आंगण मधील २६ जणांची टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त नाहीत.
