अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल:समीर नलावडे
*💫कणकवली दि.१८-:* कणकवली शहरातील स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनसाठी 22 हजार रुपये ठेकेदार कंपनीने भरले नसल्याने कणकवली शहरातील हायवेची स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगत आपली हतबलता व्यक्त केली.कोट्यावधी रुपयांचे महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला 22 हजार रूपये भरता येत नाहीत ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनीने कोणत्याही स्थितीत लाईट चालू झाली पाहिजे असा दम देत आम्हाला नाहक त्रास देऊ नका असे सुनावले.कणकवली शहरातील हायवेच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. कणकवली शहरातील चौपदरीकरण आंतर्गत स्ट्रीट लाईट व शहरात हायवे ठेकेदार कंपनीच्या चुकांमुळे पाणी साचण्याच्या घटनेबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती.कणकवली शहरातील सर्विस रोड व फ्लाय ओव्हर ब्रिज वरील लाईट सुरू करण्याबाबत सूचना देऊनही अर्धवट कामे ठेवल्याबद्दल नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महामार्ग प्राधिकरण चे उपअभियंता मण्यार व शाखा अभियंता गणेश महाजन यांनी वीज वितरण कडून याकरिता कनेक्शन मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावर नगराध्यक्ष नलावडे यांनी महावितरणच्या अभियंत्याशी संपर्क साधत माहिती घेतली. त्यावर कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी ठेकेदार कंपनीला कोटेशन देण्यात आले असून, विद्युत कनेक्शन देण्याकरिता 22 हजार रुपये भरणा करा अशा सूचना दिल्या आहेत.असे सांगितले.हे 22 हजार रुपये न भरल्यामुळे शहरातील हायवेची स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब समोर आली. तातडीने ही रक्कम भरणा करा अशा सूचना नगराध्यक्ष नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिल्या. तसेच कणकवली शहरात गोकुळधाम हॉटेलकडील नाल्यात गेली तीन वर्षे पाणी साचण्याचा प्रकार घडत आहे. वारंवार सूचना देऊन हे काम मार्गी लागले नाही. याबाबत ठोस उपाययोजना करा अशा सूचना देण्यात आल्या. त्यावर या नाल्याच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह मण्यार, महाजन यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पाहणी करत वस्तुस्थिती निदर्शनास आणली. त्यावेळी गोकुळधाम हॉटेलच्या बाजूचे जे नाल्याचे पाईप आहेत ते पाईप ठेकेदार कंपनीकडून नव्याने देण्यात येतील व ते नाल्याच्या जुन्या पाईपच्या ठिकाणी बसवण्यात येतील असे आश्वासन मण्यार यांनी दिले. तसेच महापारेषणच्या सब स्टेशन जवळ साचलेल्या पाण्याची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पिकअप शेड मुळे हे पाणी निचरा होणे बंद झाले आहे. त्यामुळे पिकअप शेड चा काही भाग काढून त्या ठिकाणी पाईप घालून पाणी निचरा करा अशा सूचना देण्यात आल्या. त्याबाबतही कार्यवाही करण्याचे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. हळवल फाटा व गोपुरी आश्रमाजवळ वारंवार अपघात होत आहेत. ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे येथे अपघाताची संख्या वाढत असून जर या अपघातांमध्ये कोणी मृत झाल्यास ठेकेदार कंपनी व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी दिला. यावेळी या दोन्ही ठिकाणी रंबलर बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणने दिली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, उप अभियंता मण्यार, शाखा अभियंता गणेश महाजन, नगरसेवक शिशीर परुळेकर, बंडू गांगण, किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
