तारकर्ली गावाला कोरोनात सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप
मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना या रुग्ण वाढीवर कोणतीही उपाय योजना न करता तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तारकर्ली गावाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ तारकर्ली गाव कृती समितीचा राजीनामा देणारे ग्रा. प.सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी आजपासून मालवण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. कोरोनाबाबत राज्यशासन व स्थानिक प्रशासन यांच्या उपाय होत नसल्याने झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण उपोषण सुरू केले आहे, असे यावेळी डॉ. केरकर यांनी सांगितले. दरम्यान, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तारकर्ली गावात कोरोना टेस्ट, लसीकरण मोहीम यासह उपाययोजना राबविण्यात येतील असे आश्वासन दिल्याने डॉ. केरकर यांनी आपले उपोषण सायंकाळी स्थगित केले. तारकर्ली गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना तारकर्ली ग्रामपंचायतीने वेळोवेळी सहकार्य करूनही तालुका प्रशासनाने ठोस उपाययोजना राबविल्या नाहीत. तारकर्ली बाबत तालुका प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही असे आरोप करत तारकर्लीचे ग्रा.पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी गाव कृती समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. आपल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास तारकर्ली गावचा कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या या गैरकारभाराविरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा डॉ. जितेंद्र केरकर यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून डॉ. केरकर यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी तारकर्लीच्या सरपंच सौ. स्नेहा केरकर उपस्थित होत्या. कोरोनावर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न राबविल्याने आपणास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण टप्प्याटप्प्याने राबविणे ही काळाची गरज आहे. त्याद्वारे कोरोना ग्रस्तांना दिलासा मिळू शकतो. लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असताना त्याबाबत उपाययोजना प्रशासनाकडून राबविली गेली नाही. राज्य शासन व प्रशासनाकडून न होणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण उपोषणास बसलो आहोत, असे डॉ. केरकर यावेळी म्हणाले. दरम्यान, सायंकाळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, नायब तहसीलदार श्री. कोकरे यांनी उपोषणकर्ते डॉ. केरकर यांची भेट घेत तारकर्ली गावात राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. पंचायत समिती मार्फत तारकर्ली गावातील सर्व वाडींमध्ये दैनंदिन कोरोना टेस्ट करण्यात येणार असून बुधवार व शुक्रवार या दिवशी कॅम्प स्वरूपात रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात येतील. त्याचप्रमाणे चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात लस साठा उपलब्ध होताच तारकर्लीतील राहिलेल्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल. तारकर्लीसह देवबाग, वायरी आदी किनारीभागात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. प्रशासनाने लसीकरणासह उपयोजना राबविण्याचे आश्वासन दिल्याने डॉ. केरकर यांनी आपले उपोषण स्थगित केले.
