प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी पाहणीत झाले स्पष्ट
*💫मालवण दि.१६-:* मालवण शहरातील गटार आणि व्हाळ्यांची खोदाई योग्यप्रकारे न झाल्याच्या मुद्द्यावरून काल नगरसेवक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्यानंतर सायंकाळी प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातील व्हाळ्यांची आणि गटारांची भर पावसात पाहणी केली. यात अनेक ठिकाणी व्हाळ्यांची खोदाई अर्धवटच झाल्याचे दिसून आले. दांडी येथील व्हाळीची खोदाई अर्धवट ठेवल्याने माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना व्हाळी थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. पावसाळा सुरू होऊनही शहरातील गटार खोदाई व व्हाळी सफाईची कामे अर्धवटच असल्याने प्रशासन कशाप्रकारे ही कामे पूर्ण करते याकडे लक्ष लागून राहिले आहे. पावसाळा सुरू होऊनही मालवण शहरातील गटार खोदाई अपूर्ण असल्याने मालवणचे नगरउपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, ममता वराडकर, पूजा सरकारे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन थेट पाहणीची मागणी केली होती. त्यावरून शाब्दिक चकमक उडून वाद झाला होता. पोलिसांनाही बोलावून घेण्यात आले होते. मात्र, सायंकाळी पाच वाजता पाहणी करण्याचे निश्चित केले गेले. या पाहणीत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुशे, पंकज सादये, आरोग्य सभापती दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, आकांक्षा शीरपुटे, सुनीता जाधव, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, सन्मेश परब आदी तसेच अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी गवंडीवाडा, मकरेबाग, वायरी मोरेश्वर वाडी, बाजारपेठ मच्छी मार्केट परिसर, मेढा काळबादेवी मंदिर नजीकची पालव व्हाळी, चिवला बीच आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. पाहणीत प्रत्यक्षात अनेक व्हाळ्यांमध्ये अर्धवटच काम झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी व्हाळ्यांची खोदाईच झाली नसल्या दिसले. जेथे खोदाई केली होती, ते व्हाळीला लागूनच माती व कचरा टाकण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे तो कचरा पुन्हा व्हाळीत पडला होता. दांडी, मेढा भागात गटारांचीही खोदाई झाली नव्हती. मुख्याधिकारी जिरगे यांनी सर्व ठिकाणी भर पावसात उतरून पाहणी केली. त्यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेकडून व्हाळी, गटारांच्या खोदाईबाबत ठोस कार्यवाही होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी खोदाईबद्दल नाराजी व्यक्त केली. या पाहणी दरम्यान मोरेश्वर वाडीतील व्हाळी पाण्याने तुडुंब भरल्याचे तसेच कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावल्याचे दिसून आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी त्याठिकाणी बांधलेली व्हाळी चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा आरोप करत व्हाळीमधील पाच ते सहा टॅक्टरच माती काढण्यात आल्याचे सांगितले. संपूर्ण व्हाळीची स्वच्छता केली नाही. त्यामुळे पाणी आता घरांमध्ये शिरण्याची भीती आहे. या व्हाळीची पूर्णपणे खोदाई होणे आवश्यक होते, असे सांगत याप्रश्नी आपण मतदानावर बहिष्कार घालण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. स्थानिक नगरसेवक सादये यांनी व्हाळीची खोदाई होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तर मेढा येथील पालव व्हाळीत मोठ्या प्रमाणात माती व कचरा साचल्याने काही प्रमाणात ही व्हाळी साफ करण्याचे काम नगरपालिकेतर्फे करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र पूर्ण व्हाळी साफ केली नसल्याचे दिसून आले. व्हाळीतुन काढलेली माती व कचरा व्हाळीलगतच ठेवण्यात आल्याने पावसामुळे तो पुन्हा व्हाळीत जाण्याची शक्यता आहे. पूर्ण व्हाळीची सफाई होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिक श्री. पालव यांनी सांगितले.
