जमीन वाचविण्यासाठी वेळप्रसंगी चिखलात आंदोलन करणार ; शेतकरी राजू माधव यांचा इशारा
*💫बांदा दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेतीच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेती वाचविण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब या दलदलमय चिखलात आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला. मडुरा-पाडलोस सीमाभागात तिलारी कालव्याचे काम सुरू आहे. कालव्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. शेतकरी राजू माधव यांनी तिलारी कालव्याच्या अधिकाऱ्यांचे अशा धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी येत्या दोन दिवसांत दगड टाकून त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याने अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला अधिकाऱ्यांनीच मूठमाती दिल्याचे श्री. माधव यांनी सांगितले.
