महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी केली चर्चा
*💫कणकवली दि.१६-:* कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे पाणी भरल्याचे समजल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नाल्याची पाहणी केली.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी चर्चा करत नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची समस्या तातडीने सोडवा,अशी मागणी केली.तर नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुळधाम येथील अडकलेली सेन्ट्रीगच्या फळ्या हटविण्यात आल्या आहेत. कणकवली शहरातील अन्य काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत नसल्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या ठिकाणची पाहणी नगरपंचायतच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत प्रश्न निकाली करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे.यावेळी गटनेते संजय कामतेकर,अजय गांगण व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
