गोकुळने वाहतूक खर्च सोसावा

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी

सिंधुदुर्गनगरी ता ०७ गोकुळ दूध संघाने वाहतूक दरवाढीचा खर्च जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संस्थांवर टाकल्याने अनेक दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. तरी गोकुळ दूध संघाने वाहतूक दरवाढीचा खर्च स्वतः सोसावा .असे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादन संघाला दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर दूध उत्पादक गोकुळ संघाच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गोकुळ दूध संघामार्फत सन २०९३ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. जिल्ह्यातील १३२ सहकारी दुग्ध संस्था गोकुळ संघास दूध पुरवठा करीत आहेत. परंतु गोकुळ दूध संघाने २२ मे २०२१ च्या पत्रान्वये प्रति लिटर १ रुपया वाहतूक खर्च संस्थेने सोसावा असे कळविले आहे .आपल्या गोकुळ दूध संघास दूध पुरवठा करावयाचा असेल तर दुग्ध संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३२ दुग्ध संस्था गोकुळ संघाशी संलग्न होण्याकरिता संस्था नोंदणीकृत करून दूध संकलन करीत आहेत. मात्र दुग्ध संस्था नोंदणीकृत झाल्यामुळे त्यांना शासन आदेशाचे पालन करणे बंधनकारक झाले आहे तसेच संस्थांच्या वार्षिक खर्चात वाढ झाल्यामुळे संस्था तोट्यात गेल्या आहेत. जिल्हा बँकेमार्फत जिल्ह्यातील दुग्ध संस्थांना कर्जपुरवठा केलेला आहे. त्यामुळे दुग्ध संस्थांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यातच कोरोना महामारीचे संकट आल्यामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट होऊन संस्था तोट्यात आल्या आहेत. तरी गोकुळ दूध संघाने वाहतूक दरवाढ खर्चाचा भुर्दंड जिल्ह्यातील दुग्ध संस्थांवर टाकू नये. दुध उत्पादकांचा दुधाचा दर कमी झाल्यास दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन या व्यवसायापासून दूर जाण्याची भीती आहे. तरी वाहतूक दरवाढीचा खर्च जिल्ह्यातील दूध संस्थांवर न टाकता तो पूर्वीप्रमाणे गोकुळ संघाने सोसावा. असे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संस्था यांच्यावतीने गोकुळ दूध संघाला दिले आहे.

You cannot copy content of this page