लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत:मोहन केळुसकर
*💫कणकवली दि.०७-:* तौक्ते चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे करण्यात आलेले पंचनामे हे कोकणवासियांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. अनेकांचे अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाहीत. नारळ-सुपारीच्या झाडांना अनुक्रमे रुपये २५० आणि ५० ही जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई आकडेवारीचा तुललेने विचार करता मोठ्या नुकसानीची भरपाई ही सुद्धा अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केले आहे. प्रसिद्ध पत्रकातून केळुसकर यांनी हे आवाहन केले आहे.राज्य शासनाचे आपदकालीन अधिवेशन नजिकच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, आमच्या कोकणातील कार्यकर्त्यांकडून शासन स्तरावर करण्यात येणार्या पंचनाम्याच्या नुकसान भरपाई संदर्भातील माहिती कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. कोकणात पहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने पंचनाम्यांचा पोरखेळ उघड केला आहे. त्यामुळे कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आवाज उठविला पाहिजे.
