आता चुका काढण्याचे दिवस नाहीत: एकत्रित कोरोनाला हरविण्याचे दिवस

पुढील पंधरा दिवसांत कोरोनाला रोखुया;नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे नागरिक, सर्वपक्षियांना आवाहन

*💫मालवण दि.०७-:* मालवण शहरात कोरोना संसर्ग वाढला असताना नगरपालिका आवश्यक त्या उपयोजना राबवत आहे. आज खरी गरज असताना शहरात पूर्वी सारखी खबरदारी व नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरात गेल्या चाळीस दिवसात ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता निर्णायक संगठित प्रयत्न करण्यासाठी जनतेने विचार करण्याची गरज आहे. कोण चुकल, का चुकल, चुकल की नाही चुकल याची टीकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येवून मालवण वरचे हे कोरोना संकट पुढील पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये नाहीसे करुन सर्व जगजीवन सुरळीत करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शासनाने ब्रेक द चेन च्या अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोबत अजून काही आस्थापना निर्बंधासह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कामकाजाचा कालावधीही वाढवला आहे. मालवण शहरात स्पीकरद्वारे मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटाइझर, या त्रिसूत्री बाबत कायम जनजागृती केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तिचा शोध घेवून त्यांची तपासणी करणेकामी पथक नेमले आहे. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. फिरत्या विक्रेत्यांची बाजारपेठेत जावून कोरोना तपासणी केली जात आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांना सबक मिळावी म्हणून त्यांची स्वॅब तपासणी केली जात आहे, असे असताना काहीजण अजुनही नियम पाळत नसल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे, असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोरोनाचे नियम न पाळल्याने सुमारे ७५ हजार रुपए एवढा दंड वसूल केला गेला आहे. आता पर्यन्त सुमारे ७ लाख ८० हजार एवढा दंड वसूल झाला आहे. व्यापाऱ्यांसाठी नियोजित वेळ संपायच्या अगोदर १५ मिनिट नगरपरिषदचा भोंगा वाजवून लोकाना अलर्ट केल जात असले तरीही न.प. च्या कारवाई पथकाला दरदिवशी नियम मोडणारे व्यापारी दिसून येत असून कारवाई करण भाग पडत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताना दिसत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागत आहे. शासन आपली कारवाई करेलच पण आता नियम तोडणाऱ्या जनतेला, व्यापारी वर्गाला प्रसंगी जनतेनेही जाब विचारण्याची गरज आहे. नियम तोडणाऱ्या व्यक्तिची, आपल्या आजुबाजुला आजारी असणारे आणि आजार लपवून ठेवणाऱ्या व्यक्तिची माहीत प्रशासनाला देणे आवश्यक आहे. जी एकजुट मालवणवासियानी तौक्ते वादळाच्या वेळी प्रशासनाला मदत करुन दाखवली तशी एकजुट आता दाखवीणे गरजेचे आहे. कोविड़ सेंटर वाढविण्या ऐवजी रुग्ण संख्या कमी करुन कोविड़ सेंटर कशी कमी करता येईल ते पाहुया. अन्यथा सध्या रुग्ण वाढीचा विचार करता मागे निवेदन केल्या प्रमाणे पुढील अनलॉकच्या धोरणामध्ये ज्या शहराची रुग्ण संख्या जास्त त्याचे निर्बंध कड़क करण्याचा शासन निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page