Headlines

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करूळमध्ये सहा वनराई बंधारे…

⚡वैभववाडी ता.०६-: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करूळ ग्रामपंचायतीच्या वतीने एका दिवसात नदीपात्रात तब्बल सहा वनराई बंधारे घालण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, नदीकाठच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याबरोबरच पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
करूळ ग्रामपंचायतीने पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रात वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. ग्रामस्थांच्या सहकार्याने एका दिवसात सहा बंधारे पूर्ण करण्यात आले. बंधाऱ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा निर्माण झाला असून, या पाण्याचा शेती, नदीकाठच्या विहिरी तसेच जनावरांसाठी मोठा फायदा होणार आहे.
या कामाची पाहणी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ आणि सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने यांनी केली. बंधाऱ्यांची पाहणी करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, कृषी विभाग अधिकारी कांता जाधव, विस्तार अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, सचिन कोलते, बबलू कोलते, सिद्धेश कोलते, निशिगंधा माळकर, प्रकाश सावंत, महेश कदम, नम्रता कदम, बबन सावंत, उदय कदम, मानाजी कदम, संदीप मोरे, वसंत जामदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page