Headlines

एमएसएमई उद्योजकांच्या वित्तीय अडचणी सोडविण्यासाठी आरबीआय कटिबद्ध…

झाराप येथे उद्योजक मेळावा:२३० उद्योजकांचा सहभाग..

⚡कुडाळ ता.०६-: सूक्ष्म आणि लघु उद्योजकांपर्यंत विशेषतः सूक्ष्म उद्योगांपर्यंत पोहोचून त्यांच्या वित्तीय तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित गरजा समजून घेणे आवश्यक आहे. उद्योजकांमध्ये बँकिंग सुविधांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक पुनीत पांचोली यांनी केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातील वित्तीय समावेशन व विकास विभागाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील झाराप येथील आराध्या हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमएसएमई उद्योजकांसाठी टाउन हॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील सुमारे २३० उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित गरजांसाठी मार्गदर्शन करणे, बँकिंग सुविधांची माहिती देणे आणि उद्योजकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा होता. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे डीजीएम बलराज टंडन, एसएलबीसीचे डीजीएम दीपक पाटील, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, अग्रणी जिल्हा प्रबंधक ऋषिकेश गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, रत्नागिरी शाखेचे प्रभारी आशीष मुंघाटे आदी उपस्थित होते.
पुनीत पांचोली यांनी बँक वित्तपुरवठा मिळविताना उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत उद्योजकांकडून अभिप्राय घेण्याची गरज व्यक्त केली. बँका, उद्योजक आणि अन्य संबंधित घटकांमध्ये द्विमार्गी संवाद निर्माण होणे आवश्यक असून लघुउद्योगांसाठी कर्ज सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एमएसएमई क्षेत्रासाठी बँकांकडून उपलब्ध असलेले कर्ज व क्षमता-वृद्धी सहाय्य याबाबत बलराज टंडन यांनी मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमएसएमई उद्योजकांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांची माहिती दीपक पाटील यांनी दिली. सिंधुदुर्गातील क्लस्टर आधारित उद्योगांच्या संधींबाबत श्रीपाद दामले यांनी मार्गदर्शन केले. तर कोकणातील एमएसएमई क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सिडबीच्या नवीन उपक्रमांची तसेच कार्यभांडवलाच्या उपलब्धतेबाबत आशीष मुंघाटे यांनी माहिती दिली.
यानंतर सिंधुदुर्गातील एमएसएमई उद्योजकांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. एमएसएमई क्लस्टर्स, कर्जदार, नवउद्योजक आणि विविध एमएसएमई संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अनुभवांवर चर्चा करण्यात आली.
खुल्या चर्चेदरम्यान कमी सिबिल स्कोअर असलेल्या नवउद्योजकांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना तारणाची मागणी, तुलनेने जास्त व्याजदर आणि कर्जप्रक्रियेतील अडथळे हे मुद्दे उद्योजकांनी मांडले. सिंधुदुर्गातील काजू प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योगांना भेडसावणारी कार्यभांडवलाची कमतरता, नवउद्योजकांसाठी कायदेशीर बाबींवरील प्रशिक्षणाची गरज तसेच जमिनीच्या संयुक्त मालकीमुळे तारण ठेवताना निर्माण होणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली.
बँकांनी उद्योगांच्या विशिष्ट वित्तीय गरजा समजून घेऊन क्लस्टरच्या गरजेनुसार ओव्हरड्राफ्ट किंवा टर्म लोन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच बँकिंग प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे सिबिल स्कोअरवर होणारा परिणाम कमी करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही उद्योजकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एफआयडीडीच्या डीजीएम डॉ. ज्योती सक्सेना यांनी स्वागतपर भाषण केले. मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे एजीएम अभिनव खरे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page